उरण प्रतिनिधी: (विठ्ठल ममताबादे): मणिपूर राज्यात गेल्या ४ महिन्यापासून हिंसक घटना घडत आहे. तसेच दोन गटातील वाद विकोपाला गेले आहेत. महिलावरील अत्याचार वाढले असून तिथे महिलांना विवस्त्र करून बलात्कार केल्या जात आहेत. दोन महिलांची नग्न धिंड काढून त्यांची हत्या करण्यात आली. या अमानवी घटनेचा सर्व स्तरातून तीव्र निषेध नोंदविल्या जात आहे. वंचित बहुजन आघाडी तर्फे सर्वत्र निषेध नोंदविण्यात आला असून दोषीवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.
या संदर्भात उरण तालुका वंचित बहुजन आघाडी तर्फे उरण पोलीस स्टेशन मधील गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कांबळे यांना निवेदन देऊन दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे उरण तालुकाध्यक्ष तुकाराम खंडागळे, महासचिव -डॉ. साहेबराव ओहोळ, सल्लागार -रघुनाथ बागुल, कार्यकर्ते -आकाश शिंगे, लखन गायकवाड, मधुकर खंदारे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.दोषीवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा तालुकाध्यक्ष तुकाराम खंडागळे यांनी दिला आहे.