Home क्राईम मडगाव रेल्वे परिसरात मध्यरात्री दारूच्या नशेत ३ गुंडांकडून महिलेवर प्राणघातक आक्रमण

मडगाव रेल्वे परिसरात मध्यरात्री दारूच्या नशेत ३ गुंडांकडून महिलेवर प्राणघातक आक्रमण

71

गोवा: ५ एप्रिल (वार्ता.) – येथील कोकण रेल्वे स्थानकासमोरील ‘मथुरा’ मद्यालयाजवळ ३ गुंडांनी रेणुका बहादूर नावाच्या एका महिलेवर प्राणघातक आक्रमण केले. ३ एप्रिल या दिवशी मध्यरात्री १२.३० ही घटना घडली. या आक्रमणामध्ये महिला गंभीररित्या घायाळ झाली आहे. महिलेचा हात आणि पाय मोडला आहे अन् तिच्यावर बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचार चालू आहेत. रात्री १२ च्या सुमाराम पीडित महिला जेवण नेण्यासाठी मद्यालयाजवळ आली होती. त्या वेळी सुनील कुमार सिंह, सुजीत कुमार सिंह आणि दिपू या ३ संशयितांनी तिचा विनयभंग करण्यास प्रारंभ केला. दारूच्या नशेत असलेल्या तिघांनीही तिच्याशी हुज्जत घालत तिला गंभीररित्या घायाळ केले. महिलेला अवजड वस्तू किंवा धारधार शस्त्र यांनी घायाळ केल्याचे प्रथमदर्शनी वाटत आहे. घटनेसंबंधी एक चलचित्रही सामाजिक माध्यमात फिरत आहे. महिलेला मारहाण का झाली ? याविषयी पोलीस अन्वेषण चालू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक तुळशीदास नाईक यांनी दिली आहे. आक्रमण करणार्‍यांपैकी सुनीलकुमार सिंह हा गुन्हेगार आहे, तर सुजीत कुमार सिंह याचीही पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे. पोलिसांनी ४ एप्रिल या दिवशी दुपारनंतर या प्रकरणी गुन्हा प्रविष्ट करून २ संशयितांना कह्यात घेतले आहे.अनधिकृत मद्यालय रात्री ३ वाजेपर्यंत बिनदिक्कत चालूप्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार या भागात ‘मथुरा’ नावाचे मद्यालय हे अवैध आहे. या मद्यालयाकडे अबकारी खात्याची अनुज्ञप्ती नाही. हे मद्यालय प्रतिदिन उत्तररात्री २-३ वाजेपर्यंत बिनदिक्कत चालू असते. याच मद्यालयाजवळ हे आक्रमण झाले आहे.