२१ ऑक्टोबर वार्ता: मडगाव एक्सप्रेसमधून गोव्याच्या दिशेने येणार्या एका प्रवाशाने रेल्वेमधील स्वयंपाकघरात (पॅन्ट्री कार) उंदरांचा सुळसुळाट झाल्याचे चलचित्र सिद्ध करून तो ‘इन्स्टाग्राम’ या सामाजिक माध्यमात प्रसारित केले. यानंतर सामाजिक माध्यमांचा वापर करणार्यांनी रेल्वे प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे हे चलचित्र सामाजिक माध्यमात प्रसारित झाल्यानंतर ‘इंडियन रेल्वेज कॅटरिंग अँड टुरिझम् कॉर्पाेरेशन’ने (‘आय.आर्.सी.टी.सी.’ने) दोषींवर योग्य कारवाई केल्याचा दावा केला आहे.संबंधित प्रवाशाने चलचित्र प्रसारित करतांना नेमके काय घडले, याविषयी माहिती चलचित्रासमवेत दिली आहे. चलचित्रामध्ये प्रवासी म्हणतो, ‘‘मी १४ ऑक्टोबर या दिवशी माझ्या कुटुंबासह मडगाव एक्सप्रेसने (११०९९) प्रवास करत होता. या वेळी काही वस्तू मिळवण्यासाठी मी रेल्वेच्या स्वयंपाकघरात (पॅन्ट्री कार) डोकावले असता मला धक्का बसला. त्या ठिकाणी मला किमान ६-७ उंदीर दिसले. मी याविषयी राखीव पोलीस दलाकडे तक्रार नोंदवली; मात्र त्यांनी मला सरळ उत्तर दिले नाही. राखीव पोलीस दलाचा प्रतिनिधी मला म्हणाला, ‘‘रेल्वे रुळाच्या बाजूने ४०० ते ५०० उंदीर आहेत आणि त्यातील ४ ते ५ रेल्वेमध्ये घुसल्यास काय झाले ?’’यानंतर मी साहाय्यक स्टेशन मास्तरकडे याविषयी तक्रार नोंदवली. साहाय्यक स्टेशन मास्तरने स्वयंपाकघराच्या (पॅन्ट्री कार) व्यवस्थापनाला संपर्क करून सर्व माहिती दिली.