Home राजकारण मंत्रिपदासाठी शिंदे गटाच्या आमदारांमध्ये हाणामारी?

मंत्रिपदासाठी शिंदे गटाच्या आमदारांमध्ये हाणामारी?

168

६ जुलै वार्ता: राज्यातील शिंदे सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे. दरम्यान, शिंदे गटातील अनेक आमदार मंत्रिपदासाठी मुंबई आणि दिल्लीत फिल्डिंग लावत आहेत. परंतु मंत्रिमंडळाच्या विस्तारात राष्ट्रवादीच्या नऊ नेत्यांचा समावेश करण्यात आल्याने शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. शिंदे गटाचे आमदार भारत गोगावले आणि संजय शिरसाट यांनी उघडपणे नाराजी बोलून दाखवली आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात काहीही आलबेल नसल्याचे दिसत आहे. त्यातच आता मंत्रिपदासाठी शिंदे गटाच्या दोन आमदारांमध्ये हाणामारी झाल्याची माहिती आहे. मंत्रिपदाच्या मुद्द्यावरून शिंदे गटाच्या आमदारांमध्ये बाचाबाची आणि वादावादी झाली. त्यानंतर प्रकरण किरकोळ हाणामारीपर्यंत पोहचले. ज्यांना वर्षभर मंत्रीपद मिळाले आहे, त्यांचा राजीनामा घेऊन इतरांना संधी द्या, अशी मागणी काही आमदारांनी केली. त्यानंतर शिंदे गटाच्या आमदारांमध्ये अचानक जोरदार राडा झाला.

आमदारांमध्ये वाद झाल्याची माहिती समजताच शिंदे हे नागपूर दौरा अचानक रद्द करत मुंबईत दाखल झाले. त्यानंतर वाद घालणाऱ्या आमदारांची शिंदे यांच्या उपस्थितीत समजूत काढण्यात आली. बुधवारी रात्री उशीरापर्यंत मुख्यमंत्र्यांकडून भांडखोर आमदारांच्या वादात मध्यस्थी करण्यात आल्याची माहिती आहे. परिणामी, आता मुख्यमंत्री शिंदे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. तसेच येत्या ११ ऑगस्टपर्यंत शिंदे गट शिवसेनेतील १६ आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय येणार असल्यानेही शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.