मंडणगड: तालुक्यातील भोळवली येथील धरणाच्या भिंतीला गळती लागल्याने दापोलीच्या पाटबंधारे विभागाने २६ जुलैला ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर धरणात साठलेल्या पाण्याचा विसर्ग चालू केला आहे; मात्र ग्रामस्थांमध्ये अद्यापही भीतीचे वातावरण कायम आहे. या पार्श्वभूमीवर तहसीलदार तानाजी शेजाळ, पोलीस निरीक्षक शैलजा सावंत, लघु पाटबंधारे विभागाचे उपअभियंता गोसावी यांनी २७ जुलैला ग्रामस्थांना मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. नदीकिनारी असलेल्या गावातील ग्रामस्थ आणि धोकादायक घरांमुळे खबरदारी घेण्याच्या सूचना महसूल विभागाच्या वतीने देण्यात आल्या आहेत, तसेच पाटबंधारे विभागाला योग्य ती कारवाई करण्याची सूचनाही महसूल विभागाने दिलेली आहे.देवाचा डोंगर येथून उगम पावणार्या भारजा नदीचे पाणी अडवून बांधण्यात आलेल्या या माती धरणाचा आकार लघु स्वरूपाचा असून धरणाची पाणी साठवण्याची ६.९१ दशलक्ष घनमीटर इतकी आहे.
या नदीच्या प्रवाह मार्गावर कादवण, लाटवण, पिंपळोली तिडे, तळेघर, चिंचघर यांसारखी १२ गावे येतात. या गावांतील नदीकिनारी असलेल्या गावांना धरणातून पाणी सोडल्याने प्रवाहाची पाणीपातळी वाढल्याने धोका निर्माण होऊ शकतो.धरणाला गळती लागल्याचे स्थानिक महसूल प्रशासनासही माहिती देण्यात आली आहे. पाटबंधारे विभाग दापोली धरणावर लक्ष ठेवून आहेत. धरण सुरक्षित आहे अथवा नाही आणि गावास किती धोका आहे ? याविषयी यंत्रणेने योग्य तो खुलासा वेळेवर करण्याची मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.