भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणानंतर हिंदुत्ववादी कार्यकर्ते मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांच्यावर पु्ण्यात एट्रॉसिटी आणि दंगल भडकावणे या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणी अनेक मतभेद नोंदवले गेले होते. तर आता पुन्हा एकदा समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी मोठा खुलासा केला आहे. याबाबत बोलताना मिलिंद एकबोटे यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांच्या संदर्भाताली दावा दाखल करण्यासंदर्भात मी वकिलांकडे आग्रह करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
भीमा कोरेगाव प्रकरणात आपल्याला विनाकारण गोवलं गेलं आहे. असं सांगत हिंदुत्वाचे प्रामाणिक काम केले तर त्याला बदनाम करायचं. हेच या प्रकरणावरून स्पष्टपणे दिसत असल्याची गंभीर टीका मिलिंद एकबोटे यांनी केली आहे. या प्रकरणामध्ये माझा काहीही संबंध नव्हता असंही त्यांनी यावेळी सांगितले.
नेमकं काय म्हणाले मिलिंद एकबोटे? मी गेल्या ३५ वर्षांपासून क्रांतिवीर लहुजी वस्ताद प्रतिष्ठानच्या माध्यमातून दलितांच्या उन्नतीचे काम करतो आहे. त्यांच्याबाबत विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून माझे काम सुरु आहे. तरीसुद्धा माझ्यावरती त्यांनी खोटे आरोप केले. भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणानंतर त्या प्रकरणी वेगवेगळ्या पद्धतीने चौकशी करण्याचे काम करण्यात आले आहे. त्यावेळी चौकशी आयोगासमोर प्रकाश आंबेडकर यांच्याकडे प्रतिज्ञापत्र आले तरी त्यांनी माझ्या नावाचा उल्लेखसुद्धा केला नाही.तर कोणतेही पुरावे नसल्याने शरद पवार यांनीदेखील या प्रकरणात घुमजाव केला असून त्यांच्या प्रतिज्ञापत्रात देखील माझं नाव नाही.
भीमा कोरेगाव प्रकरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारे चौकशी करण्यात आली आहे. त्यानंतर एनआयएनेदेखील त्यामध्ये क्लीन चीट दिली आहे तरीही भीमा कोरेगाव प्रकरणात माझं नाव घेतलं जाते. या प्रकरणाची माहिती बाहेर येणे गरजेची आहे. तसेच यावेळी ते म्हणाले की, या प्रकरणाची चौकशी बाहेर येऊ द्या मग आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू व या संदर्भात दावा दाखल करण्यासंदर्भात मी वकिलांकडे आग्रह करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.