सिंधुदुर्ग प्रतिनिधी: स्विस बँकांमध्ये असलेली भारतीय नागरिक आणि आस्थापने यांची रक्कम गेल्या वर्षी ११ टक्क्यांनी अल्प होऊन ३.४२ अब्ज स्विस फ्रँक (अनुमाने ३० सहस्त्र कोटी रुपये) झाली आहे. स्वित्झर्लंडमधील मध्यवर्ती बँक ‘एस्.एन्.बी.’ने २२ जून या दिवशी वर्ष २०२२ ची आकडेवारी घोषित केल्यावर ही माहिती समोर आली आहे. १. वर्ष २०२१ मध्ये भारतीय ग्राहकांनी स्विस बँकांमध्ये ३.८३ अब्ज स्विस फ्रँक (साधारण ३५ सहस्त्र कोटी रुपये) इतकी रक्कम ठेवली होती. हा १४ वर्षांतील उच्चांक होता.२. स्विस बँकांमध्ये भारतियांद्वारे ठेवण्यात आलेली एकूण रक्कम वर्ष २००६ मध्ये ६.५ अब्ज फ्रँकच्या (साधारण ६० सहस्त्र कोटी रुपयांच्या) विक्रमी स्तरावर होती. यानंतर त्यात घसरण झाली. तरीही वर्ष २०११, २०१३, २०१७, २०२० आणि २०२१ या कालावधीत स्विस बँकांकडे ठेवण्यात आलेल्या भारतीय ग्राहकांच्या रकमेत वाढ झाली होती.