मालवण: स्वातंत्र्यवीर सावरकरांना पेन्शनवीर, माफीवीर संबोधले जाते. त्यावेळी त्याचे उत्तर देण्यासाठी आमच्याकडे काहीच नसते. कारण आमचे वाचन नाही. आपले ज्ञान उत्तर देण्यासाठी कमी पडते. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी जाणून घेण्यासाठी त्यांच्या साहित्याचे वाचन करायला हवे. मी सावरकर लिहिणे सोपे आहे. परंतु तसे वागणे फारच कठीण आहे. त्यासाठी सावरकरांच्या साहित्याचे वाचन करून सावरकरांना जाणून घ्या. त्यातून सूजाण समाजाची निर्मिती होईल. असे प्रतिपादन सावरकर प्रेमी सिने नाट्य अभिनेते शरद पोंक्षे यांनी मालवण येथे बोलताना केले. मालवण पालिकेच्या मामा वरेरकर नाट्यगृह येथे विश्व हिंदू परिषद मालवण शाखेच्या वतीने ‘स्वातत्र्यंवीर सावरकर विचारदर्शन’ व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उदघाटन शरद पोंक्षे यांच्या हस्ते भारतमाता, छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करत तसेच दीपप्रज्वलनाने झाले. व्यासपीठावर विश्व हिंदू परिषदेचे प्रखंड मंत्री भाऊ सामंत, अनिरूद्ध भावे, आनंद प्रभु, डॉ. सुभाष दिघे, अजित पाठक, संदिप बोडवे आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचा प्रारंभ अष्टपैलु कलानिकेतनच्या गायकांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विविध गीताने केला. शरद पोंक्षे म्हणाले, १९४७ साली भारत देश स्वतंत्र झाला. भारताच्या स्वातंत्र्यासाठी स्वांतत्र्यवीर सावरकरांनी आपल्या आयुष्याची होळी केली. अशा या भारताच्या महान सुपुत्राचा गौरव व्हायला हवा होता. परंतु काँग्रेसने गलिच्छ राजकारण करून स्वातंत्र्यवीर सावरकरांना बदनाम करून त्यांचा अपमान करण्याचे काम केले. त्यामुळे सावरकर कोण होते हे सांगण्याची आज गरज निर्माण झाली आहे. ज्यांनी सावकरांची बदनामी केली. त्यांच्यासाठी सावरकर कोण होते हे आम्ही सांगतच नाही. कारण त्यांनी झोपेचे सोंग घेतले आहे. आम्ही भारतातल्या लोकांना सावरकर समाजावून सांगत आहोत. कारण त्यामधूनच प्रगल्भ समाजाची निर्मिती होणार आहे.ते म्हणाले, १९०५ साली २५ वर्षाचे असताना कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी सावरकर हे इंग्लंडला रवाना झाले. सावरकर हे नोकरी मिळविण्यासाठी इंग्लडला गेले नाही. तर इंग्रज हे भारताबरोबरच युरोप व जगातील इतर देशांमध्ये अमानुष अत्याचार करत होते. त्यामुळे इंग्रजांचा हा मुखवटा फाडणे गरजेचे होते. त्यासाठी इंग्रजांच्या कायद्याचे ज्ञान घेऊन त्यांना इंग्रजांविरोधात कायदेशीर लढाई लढायची होती. त्यामुळे इंग्लडला जाऊन ते बॅरिस्टर झाले.कार्यक्रमाच्या यशस्विततेसाठी विजय केनवडेकर, ज्योती तोरसकर, विद्याधर केनवडेकर, गार्गी कुशे, बबन परूळेकर, पार्थ आजगावकर, नंदु फणसेकर, सुभाष कुमठेकर, सुदेश आचरेकर, दिपक पाटकर, दत्ता सामंत यांचे सहकार्य लाभले. सुत्रसंचालन ज्योती तोरसकर व भाऊ सामंत यांनी केले. कार्यक्रमाची सांगता गौरी सामंत यांनी सादर केलेल्या संपूर्ण वंदे मातरम या राष्ट्रगीताने करण्यात आली. या कार्यक्रमास भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, अशोक सावंत यांच्यासह भाजप व शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शविली. *मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे कौतुक*वीर सावरकर आवडणारे व मानणारे अनेक मुख्यमंत्री झाले. परंतु शासकीय पातळीवरून सावरकरांचे विचार लोकांपर्यत पोहचवण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावरकर गौरवयात्रा आयोजनाच्या माध्यमातुन केले आहे. काँग्रेसचे स्वातंत्र्यवीर सावरकरांची नेहमीच अवहेलना केली. काँग्रेसकडून सावरकरांचा आजही अपमान केला जात आहे. परंतु त्या अपमानाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहिरपणे गौरवयात्रेच्या माध्यमातून उत्तर दिले आहे.
विश्व हिंदू परिषद मालवण शाखेच्या वतीने ‘स्वातत्र्यंवीर सावरकर विचारदर्शन’ व्याख्यान ; निलेश राणेंसह सावरकर प्रेमींची मोठी उपस्थिती