अवघ्या १२ दिवसांत भारताला मागे टाकत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरून जागतिक विक्रम बनवण्याचा रशियाचा प्रयत्न !
सिंधुदुर्ग प्रतनिधी: भारतीय अंतराळ संशोधन संस्था, म्हणजेच इस्रोने प्रक्षेपित केलेले ‘चंद्रयान ३’ हे चंद्राच्या भूमीवर २३ ऑगस्ट या दिवशी यशस्वीरित्या उतरवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. असे झाले, तर भारत हा चंद्रावर उतरणारा चौथा देश बनेल, तसेच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाय रोवणारा पहिला देश बनण्याचा बहुमानही भारताला लाभणार आहे. अशातच गेल्या २ वर्षांपासून रखडलेले रशियाचे ‘लुना २५’ हे यान ११ ऑगस्ट या दिवशी चंद्रावर जाण्यासाठी प्रक्षेपित करण्यात येईल, अशी घोषणा रशियाची अंतराळ संस्था ‘रॉसकॉसमॉस’ने केली आहे. ‘लुना २५’चे रॉकेट अत्यंत शक्तीशाली असून ते अवघ्या १२ दिवसांतच, म्हणजे २३ ऑगस्ट या दिवशीच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याचा प्रयत्न करणार आहे. यामुळे आता भारत आणि रशिया यांच्यापैकी कुणाचे यान आधी उतरते, याकडे जगाचे लक्ष आहे. सध्या चंद्रायान ३ चंद्राच्या १ सहस्र ४३७ किमी अंतरावरून चंद्राला प्रदक्षिणा घालीत आहे.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचे महत्त्व !
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाण्याचा अंश (बर्फ) असल्याचे वैज्ञानिकांचे मत आहे. ही याने याचा अभ्यास करणार आहेत. जर यामध्ये तथ्य आढळले, तर बर्फाच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्यासमवेतच प्राणवायू आणि इंधन यांची निर्मिती करता येईल, असे वैज्ञानिकांना वाटते. यामुळे भविष्यात चंद्रावर मानवाची वसाहत निर्माण होऊ शकेल, असेही वैज्ञानिकांचे स्वप्न आहे.