३१ डिसेंबर वार्ता: राज्यातील गरजू आणि अर्थिक उत्पन्न कमी असलेल्या नागरिकांना दोन वेळचे चांगले जेवण मिळावे, यासाठी सरकारमार्फत कमी पैशांत रेशन पुरवले जाते. रेशनचे धान्य खाणाऱ्या सर्वच नागरिकांसाठी आता मोठी बातमी समोर आली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे एक जानेवारीपासून राज्यभरातील रेशन दुकानदारांचा बेमुदत संप सुरू होणार आहे. याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, रेशन दुकानदारांच्या विविध मागण्या अद्यापही प्रलंबित आहेत. या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी देशपातळीवरील ऑल इंडिया फेअर, प्राईस शॉप डिलर्स फेडरेशनने उद्यापासून बेमुदत संप पुकारणार असल्याचे जाहीर केले आहे. रेशन दुकानदारांना मार्जिन इन्कम गॅरंटी ५० हजार करा, टू जी ऐवजी फोरजी मशीन द्या, मार्जिन मनी ३०० रुपये करा, कालबाह्य नियम बदला, आनंदाचा शिधा कायमस्वरुपी करा, तसेच चणाडाळ, तूरडाळ, मूगडाळ या वस्तू रेशन दुकानात उपलब्ध करा यासारख्या विविध मागण्यांसाठी रेशन दुकानदार उद्यापासून संप पुकारणार आहेत. ऐन नव वर्षांच्या पहिल्याच दिवसापासून रेशन दुकान बंद असणार आहे. परिणामी सामान्य आणि गरजू नागरिकांची चिंता वाढली आहे.