सिंधुदुर्ग प्रतिनिधी: पुणे पोलिसांनी चार दिवसांपूर्वी ‘इसिस‘ या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेशी निगडित दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेतले होते. त्यांच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दहशतवाद्यांनी आंबोलीच्या गर्द जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी केली होती. तर त्याच्या आधी काही दिवस ते निपाणी आणि संकेश्वर परिसरात वास्तव्यास होते, असे उघडकीस आले आहे. त्यांना आश्रय देणाऱ्यांची पुणे पोलिसांनी चौकशी चालवली आहे.पुणे एटीएसच्या पथकाने मंगळवारी (25 जुलै) आंबोलीच्या जंगलात येऊन घटनास्थळाची पाहणी केली. त्याठिकाणी काही महत्त्वाचे धागेदोरे या पथकाच्या हाती लागले आहेत, अशी माहिती पथकातील सूत्रांनी दिली. मात्र, या कारवाईबाबत एटीएसच्या अधिकाऱ्यांनी कमालीची गुप्तता बाळगली आहे. हे दहशतवादी तब्बल चार दिवस आंबोलीच्या जंगलातही वास्तव्यास होते.

पुणे-कोथरुड पोलिस स्थानकाचे कर्मचारी प्रदीप चव्हाण, अमोल नाझ हे पेट्रोलिंग करत असताना त्यांनी मोहम्मद इमरान मोहम्मद युसूफ खान ऊर्फ अमिर अब्दुल हमिद खान व मोहम्मद युनूस मोहम्मद याकूब साकी अशा दोघांना मोटारसायकल चोरीच्या संशयातून ताब्यात घेतले होते. त्यांच्या चौकशीत हे दोघेही इसिस संघटनेचे दहशतवादी असल्याचे समोर आले. मोहम्मद आलम हा त्यांचा तिसरा साथीदार असून तो पसार आहे. दरम्यान, या दोन्ही दहशतवाद्यांनी आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी केल्याचे सांगितले. याबरोबरच कोल्हापूर व सातारा भागातील जंगलातही बॉम्बस्फोटाची चाचणी केल्याची कबुली त्यांनी दिली.
