Home स्टोरी बिळवस येथे विजेचा शॉक लागून तीन बैल मृत्युमुखी..! एक लाख ६४ हजार...

बिळवस येथे विजेचा शॉक लागून तीन बैल मृत्युमुखी..! एक लाख ६४ हजार रुपयांचे नुकसान

426

.मसुरे प्रतिनिधी: मालवण तालुक्यातील बिळवस दत्त मंदिर येथे येथील चंद्रकांत आबा पाताडे या शेतकऱ्याचे तीन बैल विजेचा शॉक लागून मृत्युमुखी पडले असून याबाबत या शेतकऱ्याचे सुमारे १ लाख ६४ हजार रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. याबाबतची प्रशासनाकडून रीतसर पंच यादी घालण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण मुळे या गरीब शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाल्यामुळे वीज वितरण कंपनीने ही नुकसान भरपाई त्वरित द्यावी अशी मागणी चंद्रकांत पाताडे यांच्या कुटुंबीयांनी आणि येथील ग्रामस्थांनी केली आहे.

 

मुसळधार पर्जन्यवृष्टी संपूर्ण जिल्ह्यामध्ये होत असून शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता चंद्रकांत आंबा पाताडे राहणार बिळवस मधला वाडा या शेतकऱ्याचे ३ बैल नेहमीप्रमाणे बिळवस दत्त मंदिर नजीक चरावयासाठी आले होते. यावेळी येथे असलेल्या वीज वितरणच्या वीज खांबा नजीक हे बैल आले असता या ठिकाणी वीज खांबातून वीज प्रवाह चालू झाल्या थेट या वीज खांबाच्या मुळाशी जमिनीतही वीज प्रवाह सुरू होता. तसेच या ठिकाणी पाणी साचलेले असल्यामुळे थेट पाण्यामध्ये वीज प्रवाह सुरू होता. या ठिकाणी हे तीनही बैल आले असता या तीनही बैलांना विजेचा शॉक लागल्यामुळे हे तीनही बैल जागीच मृत्युमुखी पडले. याबाबत चंद्रकांत पाताडे यांनी वीज वितरण शी संपर्क साधल्यानंतर वीज प्रवाह खंडित केला गेला. याबाबतची खबर मिळताच सरपंच सौ मानसी पालव, ग्रामपंचायत सदस्य संतोष पालव, स्थानिक तलाठी आर आर तारी,ग्रामसेवक युगल प्रभू गावकर, पशू  वैद्यकीय अधिकारी ए एस शिरसाट, वीज वितरणचे श्री माने, ग्रामस्थ भावेश पालव, श्री साळस्कर आदींनी या ठिकाणी भेट देऊन वस्तुस्थितीची पाहणी केली. संबंधित प्रशासनाच्या वतीने एक लाख 64 हजार रुपयांची नुकसान भरपाई पंच यादी घालण्यात आली. वीज वितरणच्या गलथान कारभारामुळे सदर वीज खांबातून वीज प्रवाह सुरू राहिल्यामुळे या तीनही बैलांचा मृत्यू झाल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी वीज वितरण च्या अधिकारी वर्गाला धारेवरती धरले. तसेच या गरीब शेतकऱ्याचे झालेले नुकसान वीज वितरण ने त्वरित भरपाई करून द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.