२५ मे वार्ता: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज गुरुवार दि.२५ मे रोजी जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम व शाखशंतील एकूण १४ लाख २८ हजार १९४ नियमित विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील १४ लाख १६ हजार ३७१ विद्यार्थी परीक्षेस बसले. प्रत्यक्षात १२ लाख ९२ हजार ४६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींचा निकाल ९३.७३ टक्के असून, मुलांचा निकाल ८९.१४ टक्के लागला. यंदाही मुलींनीच उत्तीर्ण होण्यात बाजी मारली आहे. मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा ४.५९ टक्के अधिक आहे.
बारावीच्या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखशंमधून एकूण ३५ हजार ८७९ पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३५ हजार ५८३ विद्यार्थी परीक्षेस बसले आणि १५ हजार ७७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी ४४.३३ आहे.नऊ विभागात ६ हजार ११३ दिव्यांग विद्यार्थ्यांनी परीक्षेला नोंदणी केली आणि त्यातील ६ हजार ७२ जण परीक्षेस बसले. त्यापैकी ५ हजार ६७३ जण उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी ९३.४३ आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला आहे. त्यांचा निकाल ९६.०१ टक्के तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा आहे. त्यांचा ८८.१३ टक्के निकाल लागला.