२८ जून वार्ता: राजापूर तालुक्यातील बारसू प्रस्तावित असलेला ग्रीन रिफायनरी प्रकल्पाबाबत केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे म्हणाले की, २ लाख कोटींची गुंतवणूक असलेल्या या प्रकल्पातून अनेकांना रोजगार मिळणार आहे. त्याचवेळी प्रकल्पाच्या माध्यमातून देशासह राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती मिळणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प होणारच आहे. असं नारायण राणे यांनी सांगितलं.
राजापूर तालुक्यातील बारसूमध्ये रिफायनरी प्रकल्पाची उभारणी प्रस्तावित असल्याचे बोलले जात आहे. त्या अनुषंगाने मे महिन्यामध्ये माती परीक्षणाचेही काम हाती घेण्यात आले होते. मात्र, या रिफायनरी प्रकल्पविरोधी स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला होता. यावेळी हजारो वर्षापूर्वींच्या मानवी लोकवस्तीच्या पाऊलखुणा सांगणारी कातळशिल्पेही चर्चेचा विषय ठरला होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षामध्ये केलेली विकासकामे सर्वासमोर पोहचवण्याच्या उद्देशाने भाजपतर्फे महाजनसंपर्क अभियान राबवले जात आहे. या अभियानांतर्गंत भाजपची सोमवारी जाहीर सभा झाली. या सभेमध्ये केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी प्रकल्प होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. राजापूर तालुक्यातील प्रस्तावित असलेला ग्रीन रिफायनरी प्रकल्प लवकरच मार्गी लागणार असून याबाबत केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांसोबत आपली चर्चाही झालेली आहे. असेही केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी यावेळी सांगितलं.