Home स्टोरी बाबासाहेबांच्या स्वप्नपूर्तीसाठी अभ्यास करून अधिकारी व्हा.! – प्रा. रुपेश पाटील

बाबासाहेबांच्या स्वप्नपूर्तीसाठी अभ्यास करून अधिकारी व्हा.! – प्रा. रुपेश पाटील

112

कोरगाव येथे व्याख्यान संपन्न.

 

सावंतवाडी: फक्त वही आणि पेन म्हणजे शिक्षण नव्हे तर बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण, अशी शिकवण देणारे एकविसाव्या शतकातील सर्वोच्च बुद्धीसम्राट म्हणजे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यांनी दिलेला ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा!’ या मंत्राचा आताच्या युवकांनी निश्चितच वापर करून बाबासाहेबांच्या स्वप्नपूर्तीसाठी खूप अभ्यास करावा व स्वतःला अधिकारी म्हणून सिद्ध करावे, हिच खरी बाबासाहेबांना आदरांजली ठरेल, असे मत सुप्रसिद्ध युवा व्याख्याते प्रा. रुपेश पाटील यांनी कोरगाव (ता. पेडणे – गोवा) येथे आयोजित व्याख्यानादरम्यान केले.

 

सिद्धार्थ युवा सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ देऊळवाडा, कोरगाव ता. पेडणे (गोवा) येथे विश्वबसल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त रविवार, दिनांक २७ एप्रिल रोजी प्रा. रुपेश पाटील यांचे ‘ बाबासाहेबांना समजून घेताना.!’ या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गोव्यातील सुप्रसिद्ध साहित्यिक चंद्रकांत जाधव उपस्थित होते. तर व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष संजय कोरगावकर, युवा कार्यकर्ते दिवाकर जाधव, संस्थेचे, सचिव रमेश जाधव खजिनदार नवसो जाधव, सामाजिक कार्यकर्ते राजू जाधव आदी उपस्थित होते.

 

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान बुद्ध व बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर शालेय विद्यार्थ्यांसाठी वेशभूषा स्पर्धा देखील घेण्यात आल्या.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. रुपेश पाटील यांचे ‘डॉ. बाबासाहेबांना समजून घेताना.!’ या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. यावेळी प्रा. पाटील पुढे म्हणाले की, बाबासाहेब म्हणजे मूर्तीमंत बंड होते. ज्यांच्या देहातील कणाकणातून बंड थैमान घालीत असे. बाबासाहेब म्हणजे जुलमी व अत्याचारी व्यवस्थेविरुद्ध उद्गारलेली एक वज्रमूठ आहेत. जातीभेदाविरुद्ध आणि विषमतेविरुद्ध प्रहार करण्याचे चक्र म्हणजे बाबासाहेब आहेत. धर्ममार्तंडाच्या वर्णव्यवस्थेचा कोथळा फोडून त्यांची आतडी बाहेर काढणारी ‘वाघनखे’ म्हणजे बाबासाहेब आहेत. बाबासाहेब आजच्या घडीला आपल्या सर्वांना आदर्शवत ठरतात ते त्यांच्या त्याग आणि समर्पण वृत्तीमुळे. या देशात न्याय, समता, बंधुता या मूल्यांची पायमल्ली होत असताना आणि माणुसकीची हत्या व दीनदुबळ्यांवर अत्याचार होत असताना बाबासाहेबांसारखा प्रकांड पंडित संविधाननिर्मिती सारखे एक महान लोकशाही प्रस्थापित करणारे लेखी स्वरूपात शस्त्र आपल्याला प्रदान करतात. ही फार महान गोष्ट आहे. बुद्धिमत्तेचे विलक्षण तेज असतानाही, नम्रता, स्वाभिमान आणि प्रामाणिकता असा ‘त्रिवेणी संगम’ असलेले बाबासाहेब हे जगभरासाठी आदर्शवत आहेत. असे सांगत प्रा. रुपेश पाटील यांनी बाबासाहेबांचे विविध पैलू सांगून उपस्थितांना बाबासाहेब आपण का समजून घेतले पाहिजेत.?, याबद्दल सखोल मार्गदर्शन केले.

 

पाहुण्यांचा परिचय अक्षय जाधव यांनी केला तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजू जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीलचरण जाधव यांनी तर आभार प्रदर्शन किशन जाधव यांनी केले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत जाधव यांनी देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा तत्कालीन लढा आणि संघर्ष विशद करत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

 

दरम्यान यावेळी घेण्यात आलेल्या वेशभूषा स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.