Home क्राईम बनावट नोटांची छपाई करून ते चलनात आणणार्‍या ७ आरोपींना अटक!

बनावट नोटांची छपाई करून ते चलनात आणणार्‍या ७ आरोपींना अटक!

190

२६ जुलै वार्ता: बनावट नोटा सिद्ध करून चलनात आणण्याचा प्रयत्न करणार्‍या टोळीला बार्शी शहर पोलिसांनी पकडले आहे. या कारवाईत ५ लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करून टोळीतील ७ जणांना बार्शी शहर पोलिसांनी अटक केली आहे. मिरगणे कॉम्प्लेक्स गाळ्यातील व्यापार्‍यांकडे २ व्यक्ती बनावट नोटा खपवण्याच्या प्रयत्नात असल्याची गोपनीय माहिती १९ जुलै या दिवशी बार्शी शहर पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी सापळा रचत २ जणांना अटक केली. त्यांची कसून चौकशी केली असता या साखळीतील आरोपी सुनील कोथिंबिरे, आदित्य सातभाई, खदीर जमाल शेख, विजय वाघमारे, आप्पा जगन्नाथ बगाडे, जमीर महमंद सय्यद यांनाही अटक करण्यात आली.

कह्यात घेतलेल्या सर्व आरोपींची चौकशी केली असता या बनावट नोटा मोहोळ तालुक्यातील चिंचोळीकाटी येथे ललित चंद्रशेखर व्होरा याच्या घरात छपाई होत असल्याचे लक्षात आले. या वेळी तेथे ८० सहस्र रुपयांच्या नोटा, एच्.पी. रंगीत प्रिंटर, कटर, पट्टी, कागदावर बनवलेल्या अर्धवट नोटा, तसेच नोटा बनवण्याचे अन्य साहित्य जप्त केले. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत ४ लाख रुपयांच्या नोटा जप्त केल्या आहेत. या प्रकरणातील सर्व आरोपी बीड, सातारा, सोलापूर, नाशिक अशा विविध जिल्ह्यांतील असल्याने यात आणखी कितीजण सहभागी आहेत, याचे अन्वेषण पोलीस करत आहेत.