सावंतवाडी प्रतिनिधी: बँक ऑफ इंडियाच्यावतीने ओटवणे शाखेत ५७ वा बँक राष्ट्रीयीकरण दिन साजरा करण्यात आला. बँक राष्ट्रीयीकरण दिन हा भारताच्या बँकिंग इतिहासातील एक महत्त्वाचा क्षण आहे. १९ जुलै १९६९ रोजी भारत सरकारने १४ प्रमुख व्यावसायिक बँकांचे राष्ट्रीयीकरण केले. त्यामुळे देशाच्या आर्थिक क्षेत्रात क्रांती घडली.
बँक राष्ट्रीयीकरणामुळे ग्रामीण भागात बँकिंग सेवांचा विस्तार होऊन आर्थिक समावेशन आणि आर्थिक विकासाला चालना मिळाली. तसेच सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी सामाजिक बँकिंग धोरणे लागू करण्यासह लघु उद्योग, शेती आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पर्यायाने या राष्ट्रीयीकरणामुळे भारताच्या आर्थिक प्रगतीचा मार्ग मोकळा झाला आणि सरकारला कर्ज प्रवाह निर्देशित करण्यास आणि आर्थिक धोरणे अंमलात आणण्यास सक्षम केले.
यावेळी मार्गदर्शन करताना बँकेचे ओटवणे शाखा व्यवस्थापक लक्ष्मण बोधवड म्हणाले बँक राष्ट्रीयीकरण दिन हा भारताच्या बँकिंग इतिहासातील एक सुवर्णक्षण आहे. ग्राहकांना उत्कृष्ट सेवा प्रदान करण्यासह स्थानिक व्यवसायांना पाठिंबा देण्यासाठी आणि देशाच्या आर्थिक वाढीमध्ये योगदान देण्यासाठी बँक ऑफ इंडिया वचनबद्ध आहे. ग्रामीण भागातील शाखेत ठेवी वाढल्यास कारागीर लघु उद्योजक शेतकरी यांना जास्तीत जास्त कर्ज पुरवठा करता येईल. आणि यातून बँकेसह आपल्या भागाचा सर्वांगीण विकास साधता येईल. तसेच थकीत कर्जदारांनी वन टाइम सेटलमेंट योजनेचा लाभ घेऊन कर्ज मुक्त व्हावे. यावेळी अधिकारी शुभम जाधव, श्री वेंकटेश, श्रीम. गावडे आणि ग्राहक उपस्थित होते.