Home शिक्षण बँकिंग क्षेत्रातून कृषी उद्योजकतेकडे वाटचाल – कोकण कृषी विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्याचे विद्यार्थ्यांना...

बँकिंग क्षेत्रातून कृषी उद्योजकतेकडे वाटचाल – कोकण कृषी विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्याचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.

154

सिंधुदुर्ग: नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या “दीक्षारंभ” कार्यक्रमांतर्गत (Socialising, Associating, Acclimatizing, Experiencing या चार स्तंभांवर आधारित) उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे (डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली संलग्न) येथे उद्योजकतेवरील प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी श्री. अद्वैत पाटकर, फळ प्रक्रिया उद्योजक, लांजा (जि. रत्नागिरी) तसेच कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीचे माजी विद्यार्थी, हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यांनी बँकिंग क्षेत्र व इतर खासगी कंपन्यांमधील अनुभवाच्या आधारे आपला व्यवसाय यशस्वीरीत्या उभारला असल्याचे सांगितले. आपल्या व्यावसायिक प्रवासाचे प्रेरणादायी कथन करताना त्यांनी विविध क्षेत्रातील अनुभव उद्योजकतेस कसा हातभार लावतो हे विद्यार्थ्यांना पटवून दिले.

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी जागतिक स्तरावर यशस्वी ठरलेल्या उद्योजकांच्या कथा सांगितल्या आणि पारंपरिक नोकरीच्या चौकटीबाहेर जाऊन नवे मार्ग शोधण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून म्हटले – “प्रत्येक मोठ्या प्रवासाची सुरुवात एका छोट्या पावलापासून होते; ते पाऊल आत्मविश्वासाने टाका.”

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विजय दळवी यांनी श्री. पाटकर यांचे स्वागत केले. आपल्या भाषणात त्यांनी राष्ट्राच्या समृद्धीत पदवीधर विद्यार्थ्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. नोकरीच्या संधींसोबतच उद्योजकतेचा मार्ग स्वीकारून रोजगारनिर्मिती व आर्थिक विकासाला हातभार लावणे ही आजची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा. हर्षवर्धन वाघ, सहाय्यक प्राध्यापक (कृषी अर्थशास्त्र) यांनी केले. त्यांनी श्री. पाटकर यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल असे नमूद केले.

विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उद्योजकाने दिलेल्या उत्तरे व संवाद यामुळे कार्यक्रम अधिक रंगतदार झाला. “दीक्षारंभ” कार्यक्रमाच्या मूळ उद्दिष्टानुसार हा उपक्रम विद्यार्थ्यांना केवळ महाविद्यालयीन जीवनाशी जुळवून घेण्यापुरता न राहता त्यांना भविष्यातील नेता, नवोन्मेषक व समाजासाठी योगदान देणारे जबाबदार नागरिक बनविण्याकडे प्रेरित करणारा ठरला.