Home स्टोरी फॉक्सकॉनने घेतला वेदांतासोबतच्या सेमीकंडक्टर प्रकल्पातून बाहेर पडण्याचा निर्णय!

फॉक्सकॉनने घेतला वेदांतासोबतच्या सेमीकंडक्टर प्रकल्पातून बाहेर पडण्याचा निर्णय!

178

११ जुलै वार्ता: फॉक्सकॉनने वेदांतासोबतच्या सेमीकंडक्टर प्रकल्पातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्यावर्षी हा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला वळवण्यात आला होता. फडणवीस-शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर हा प्रकल्प गुजरातला मिळाला अशी टीका विरोधकांनी केली होती. पण या प्रकल्पासाठीची बोलणी महाविकास आघाडीच्या काळातच सुरू होती, असं शिंदे सरकारने प्रत्त्युत्तरात म्हटलं होतं.

फॉक्सकॉनने हा प्रकल्प एकूण १ लाख ५४ हजार कोटींचा असल्याचं सांगण्यात आलं होतं. पण एका वर्षापेक्षा कमी कालावधीतच फॉक्सकॉनने या प्रकल्पातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हा भारताच्या तंत्रज्ञान उद्योगासाठी लागणाऱ्या चीप उत्पादन क्षमतेला मोठा धक्का असल्याचं विश्लेषकांचे म्हणणे आहे. दरम्यान चीप उत्पादन करण्याच्या भारताच्या प्रयत्नांवर या निर्णयाचा कोणताही परिणाम होणार नाही, असं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान गुजरातमधील सेमीकंडक्टर प्रकल्पातून बाहेर पडलो असलो तरी आम्ही भारतात विकासाच्या आणखी वेगळ्या संधी शोधू, वेदांता कंपनीसोबतचा हा निर्णय परस्पर संमतीने झाला आहे. आता या प्रकल्पाची पूर्ण मालकी वेदांताने स्वीकारली आहे. असं,” फॉक्सकॉन कंपनीने बीबीसीला सांगितलं आहे.

या घडामोडीनंतर केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी ट्वीटद्वारे सरकारची बाजू मांडली. “भारत सरकार चीप उत्पादन उद्योगाला पाठिंबा देण्यासाठी धोरणांवर काम करत आहे. परदेशी चीप निर्मात्या कंपन्यांवर कमी अवलंबून राहण्यासाठी या क्षेत्रात अधिक गुंतवणूकदारांना आकर्षित केलं जात आहे. त्यासाठी गेल्यावर्षीच १० अब्ज डॉलर्सचा फंड तयार केला,” असं चंद्रशेखर यांनी ट्वीट केलं आहे.