Home स्टोरी प्रदीप कुरुलकर यांनी क्षेपणास्त्रासह ‘आकाश लाँचर’ची सर्व गुपिते पाकिस्तानला दिल्याचे ए.टी.एस्.च्या अन्वेषणात...

प्रदीप कुरुलकर यांनी क्षेपणास्त्रासह ‘आकाश लाँचर’ची सर्व गुपिते पाकिस्तानला दिल्याचे ए.टी.एस्.च्या अन्वेषणात निष्पन्न!

181

दोषारोपपत्र प्रविष्ट करून प्रदीप कुरुलकर यांच्या देशद्रोही कृत्यावर शिक्कामोर्तब!

९ जुलै प्रतिनिधी: पाकिस्तानी ललनेच्या मोहात अडकून स्वदेशी तंत्रज्ञानातून सिद्ध केलेल्या ब्राह्मोस, अग्नी क्षेपणास्त्रासह ‘आकाश लाँचर’ची सर्व गुपिते आणि त्यांचे तंत्रज्ञान ‘डी.आर्.डी.ओ.’चे शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांनीच पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेच्या हाती पाठवले असल्याचे आतंकवाद विरोधी पथकाच्या अन्वेषणात निष्पन्न झाले आहे. दोनच दिवसांपूर्वी ए.टी.एस्.ने प्रविष्ट केलेल्या दोषारोपपत्रात ही गोष्ट स्पष्ट करण्यात आली आहे. ए.टी.एस्.च्या अन्वेषण अधिकारी सुजाता तानवडे यांनी कुरुलकरांच्या विरोधात दोषारोपपत्र प्रविष्ट करून त्यांनी केलेल्या देशद्रोही कृत्यावर शिक्कामोर्तब केले आहे.

१. कुरुलकर यांनी डी.आर्.डी.ओ.त विकसित केलेल्या ‘कंपोझिट हल’, ‘ब्रह्मोस लाँचर’, ड्रोन, यू.सी.बी. ‘अग्नी मिसाईल लाँचर’, ‘मिलिटरी ब्रिजिंग सिस्टिम’ आणि ‘मिलिटरी इंजिनिअरिंग इक्विपमेंट’ सिद्ध करणे, विकसित करणे, ‘डिझाइन’ करण्याचे काम आणि इतर सुरक्षेसंबंधित गोपनीय संवेदनशील माहिती झारादास गुप्ता नाव धारण केलेल्या पाकच्या महिलेला दिली.

२. परस्त्री आकर्षणाच्या उद्देशाने झारा हिला हवी असलेली गोपनीय आणि संवेदनशील माहिती अधिकार नसतांना संग्रहित करून देण्याचे कृत्य कुरुलकर यांनी केले.

३. कुरुलकर यांनी भारतीय संरक्षण दलाची गोपनीय माहिती शत्रूराष्ट्राच्या हाती दिल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ३ मे या दिवशी गुन्हा नोंद करून त्यांना ए.टी.एस्.ने अटक केली होती. अटकेनंतर जवळपास १५ दिवसांपासून येरवडा कारागृहात असलेले कुरुलकर अन्वेषण यंत्रणेला अन्वेषणात साहाय्य करत नसल्याचे अन्वेषण अधिकार्‍यांनी न्यायालयात सांगितले होते.

४. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेली ‘हार्ड डिस्क’, भ्रमणभाष आणि संगणकात भारताने विकसित केलेल्या ‘रॉकेट लाँचर’ आणि क्षेपणास्त्राचे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनसह ते कसे वापरले जाणार आहे? याची सचित्र माहिती होती. अटकेनंतर कुरुलकर यांनी असे घडलेच नाही, असा बनाव करत अन्वेषण यंत्रणेची दिशाभूल केली.

कुरुलकरांच्या न्यायालयीन कोठडीत २१ जुलैपर्यंत वाढ!

७ जुलै या दिवशी संबंधित दोषारोपपत्राची प्रत डॉ. कुरुलकर यांच्या ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे त्यांचे अधिवक्ता ऋषिकेश गानू यांना दिली. या वेळी सरकारी अधिवक्ता विजय फरगडे हेही ए.टी.एस्.ची बाजू मांडण्यासाठी उपस्थित होते. कुरुलकरांच्या न्यायालयीन कोठडीत २१ जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे. तसेच कुरुलकरांच्या ‘व्हॉईस लेअर सायकॉलॉजिकल चाचणी’करता पोलिसांचे लेखी म्हणणे सादर करण्यास न्यायालयाने सांगितले आहे.

रोबोटिक उपकरण आणि त्याचे तंत्र धोक्यात!

कुरुलकर यांनी झारादास गुप्तासह ‘व्हॉट्सॲप मेसेज’च्या माध्यमातून ‘सरफेस टू एअर मिसाईल’विषयी आणि त्याच्या वापराविषयी माहिती देऊन त्याचे ‘टेस्टिंग’ आणि ‘ट्रायल’ दिले असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच ड्रोनविषयीची माहिती, त्याच्या क्षमतेविषयीची माहितीही दिल्याचे उघड झाले आहे. भारतीय अधिकार्‍यांना चुकीची माहिती देऊन रोबोटिक उपकरण जे शास्त्रज्ञ बनवतात, त्यांची नावेही पाकिस्तानी हस्तकास देण्यात आली असल्याचेही दोषारोपपत्रात म्हटले आहे.