जालना: जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाची मागणी करणार्या आंदोलकांवर लाठीमार करण्याचा आदेश जालना जिल्ह्याचे पोलीस उपअधीक्षक आर्. सी. शेख यांनी दिला होता, अशी माहिती आसाराम डोंगरे यांनी केलेल्या माहिती अधिकारात प्राप्त झाली. २३ ऑगस्ट या दिवशी मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या ठिकाणी पोलिसांनी लाठीमार केला होता. या प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्षमायाचना केली होती. लाठीमार करण्याचा आदेश गृहमंत्रालयातून देण्यात आला नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते; मात्र विरोधकांनी यास देवेंद्र फडणवीस यांना उत्तरदायी धरले होते. अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलनकर्त्यांवर लाठीमार करण्याचा निर्णय अपर पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपअधीक्षक यांनी घेतला. त्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी हा निर्णय घेणे आवश्यक होते. हे दोन्ही अधिकारी तेथे स्वत: उपस्थित होते, अशी माहिती छत्रपती संभाजीनगर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक (आयजी) ज्ञानेश्वर चव्हाण यांनी दिली होती.