नाशिक: शहराच्या मध्यवस्तीत दगडफेक करत दहशत निर्माण करणार्या, तसेच पोलिसांवर आक्रमण करणार्या चौघांना जिल्हा आणि सत्र न्यायाधीश मलकापट्टे रेड्डी यांनी प्रत्येकी ३ वर्षे सक्तमजुरी आणि २० सहस्र रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. घटनेच्या तब्बल १६ वर्षांनंतर न्यायालयाने आरोपींना शिक्षा ठोठावली आहे. गणेश घोडके, दीपक अहिरे, उमेश ठोके आणि किरण नागरे अशी आरोपींची नावे आहेत.
२६ फेब्रुवारी २००७ या दिवशी सायंकाळच्या सुमारास सी.बी.एस्. येथील पद्मा उपाहारगृहापासून प्रारंभ करत ८ जणांच्या टोळक्याने शरणपूर रस्त्यावरून टिळकवाडी परिसरात दुकानांवर दगडफेक केली. हातगाड्या उलटवत त्यांवरील मालाची हानी केली. हातगाडीचालकांना दमदाटी केली, तसेच रस्त्यावर दिसेल, त्याला शिवीगाळ आणि दमदाटी करत हातातील शस्त्रे फिरवत दहशत निर्माण केली. पोलिसांनी टोळक्यास नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला; मात्र टोळक्याने पोलिसांवर प्राणघातक आक्रमण करत त्यांना सरकारी काम करण्यापासून परावृत्त केले. या प्रकरणी पोलिसांनी अन्वेषण करत न्यायालयात दोषारोपपत्र प्रविष्ट केले होते. या गुन्ह्यातील संशयित मुख्य सूत्रधार मोहन चांगले याचा मे २०१३ मध्ये खून झाला होता.