Home स्टोरी पूज्य साने गुरुजी शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षा निमित्त साने गुरुजी कथामाला...

पूज्य साने गुरुजी शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षा निमित्त साने गुरुजी कथामाला मालवण साजरी करणार श्यामच्या आईचा वाढदिवस.

175

मालवण प्रतिनिधी: महाराष्ट्र माऊली पूज्य साने गुरुजींचा शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त साने गुरुजी कथामाला मालवण “श्यामच्या आई” चा वाढदिवस साजरा करणार आहे. याबाबत बोलताना सुरेश ठाकूर (अध्यक्ष कथामाला मालवण ) म्हणाले, “पूज्य साने गुरुजींना १९३२ साली स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतल्यामुळे अटक झाली. त्यांना नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले. तेथेच ते “श्यामच्या आईच्या” कथा राजबंद्यांना सांगत. ४२ रात्री त्यांनी ४२ कथा कैद्यांना सांगितल्या. त्यातील एक राजबंदी आनंद पाटील यानी गुरुजींना ह्या कथा लिहून काढायला सांगितले. साने गुरुजी ९ फेब्रुवारी १९३३ रोजी लिहायला बसले आणि सोमवार दिनांक १३ फेब्रुवारी १९३३ ला ४२ रात्री लिहून “श्यामची आई” पुस्तक हातावेगळे केले. एवढे त्यांचे हृदय मातृप्रेमाने भरलेले आणि भारलेले होते. गेल्या शतकातील आणि चालू शतकातील सर्वाधिक खपाचे पुस्तक म्हणून ‘श्यामच्या आईला’ नावलौकिक प्राप्त झाला. केवळ संख्यात्मक नाहीतर गुणात्मकही. म्हणून 9 फेब्रुवारीला ‘श्यामच्या आईचा’ 91 वा वाढदिवस साजरा करण्याचे साने गुरुजी कथामाला मालवण शाखेने आयोजन केले आहे.

सदर वाढदिवस मालवण तालुक्यातील वायंगणी ठाणेश्वर या शाळेत साजरा होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. प्रकाश किरात पेडणेकर तर प्रमुख मान्यवर म्हणून पांडुरंग गुरुदास कोचरेकर (उपाध्यक्ष कथामाला) आणि सुगंधा केदार गुरव (सचिव कथामाला) हे उपस्थित राहणार आहेत. त्यावेळी प्रतिभा महादेव मयेकर ह्या श्यामच्या आईच्या कथा सांगणार आहेत.

यावेळी त्या परिसरातील मुलांच्या सर्व आईंना ‘श्यामची आई’ हा ग्रंथ भेट म्हणून देण्यात येणार आहे. साने गुरुजी कथामाला कार्यकर्त्या आणि माजी पंचायत समिती सदस्या कै.प्राजक्ता प्रकाश पेडणेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हे ग्रंथदान होणार आहे.

सदर उपक्रमाला शुभेच्छा देताना शामराव कराळे, अध्यक्ष अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मुंबई म्हणाले की पुस्तकांचा वाढदिवस ही अभिनव कल्पना असून मालवण कथामालेचे या उपक्रमाबाबत कौतुक करायला हवे.वायंगणी ठाणेश्वरच्या मुख्याध्यापिका श्रीम.सुजाता विष्णू सावंत यांनी सदर वाढदिवसाचे आयोजन केले आहे. सदर वाढदिवसाला उपस्थित राहण्याचे आवाहन मालवण कथामालेतर्फे करण्यात आले आहे.