१७ जून वार्ता: ९५ वर्षीय रुक्मिणी मोहिते यांचे निधन झाल्यावर नवा मोदिखाना कॅम्प येथून केवळ ५०० मीटर अंतरावर असलेल्या पटेल रुग्णालयाच्या शवागारामध्ये ठेवण्यासाठी जायचे असल्याने नातेवाइकांनी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे धोबी घाट येथील वाहनतळ गाठले; मात्र त्याठिकाणी शववाहिनी चालवण्यासाठी रात्री चालकच उपलब्ध नव्हता. त्यामुळे नातेवाईक मृतदेह रिक्शातून रुग्णालयातील शवागारात ठेवण्यासाठी निघाले, तेव्हा शवागारही बंद पडलेले होते. नातेवाइकांनी रुग्णालय प्रशासनाला या सगळ्या हलगर्जीपणाविषयी विचारणा केली असता कर्तव्यावरील परिचारिकेने माहिती देण्यास टाळाटाळ केली. आधुनिक वैद्य म्हणून कंत्राटी वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
निवासी वैद्यकीय अधीक्षक डॉ. उषा तपासे यांचा बंगलाही बंद होता. त्यानंतर अखेर ससून रुग्णालयातील शवागारात मृतदेह हलवण्यात आला. रुग्णालयातून कुठल्याही प्रकारची साहाय्यता न मिळाल्याचा आरोप आजींचे नातू विक्रम मोरे यांनी केला आहे. या प्रकरणी मनसेचे पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड विभाग अध्यक्ष शिरीष आगुरेड्डी यांनी दायित्वशून्य डॉक्टर, अधिकारी यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.या प्रकरणात रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांनी शवागार बंद असण्याचे तांत्रिक कारण पुढे करत यंत्राच्या खरेदीची आणि दुरुस्तीची कागदपत्रे सापडत नसल्याने तात्पुरती देखभाल करूनही यंत्र चालत नाही, अशी उलट तक्रार केली आहे. वाहन विभागाचे हेमंत यांनीही अनावधानाने झालेली चूक असून झाल्या प्रकाराविषयी खेद व्यक्त केला आहे. ‘शववाहिनी, शवागारासारख्या आवश्यक सुविधा कॅन्टोन्मेंट बोर्ड देऊ शकत नसेल, तर कॅन्टोन्मेंट बोर्ड महापालिकेत विलीन करा’, अशी मागणी मृताचे नातेवाईक अक्षय चाबूकस्वार यांनी केली. निवासी वैद्यकीय अधीक्षक डॉ. उषा तपासे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.