Home स्टोरी पुढील ४८ घंट्यांत मोसमी पावसाच्या आगमनासाठी हवामान अनुकूल!

पुढील ४८ घंट्यांत मोसमी पावसाच्या आगमनासाठी हवामान अनुकूल!

115

‘बीपरजॉय’ चक्रीवादळामुळे गोवा आणि सिंधुदुर्ग जिल्हा येथे समुद्राला उधाण.

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: अरबी समुद्रात बीपर जॉय चक्रीवादळ निर्माण होत असल्याने कोकण किनारपट्टीला धोक्याची चेतावणी देण्यात आली होती. आता चक्रीवादळाची दिशा पालटल्याने कोकण किनारपट्टीचा धोका टळला असला, तरी येथील समुद्राला उधाण आले आहे. समुद्रात मोठमोठ्या लाटा उसळू लागल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने किनारपट्टी भागातील नागरिक आणि पर्यटक यांच्यासह संबंधित सर्व शासकीय विभागांना सतर्क रहाण्याचा आदेश दिला आहे. वेंगुर्ला येथे पोलिसांनी किनारपट्टी भागातील सुरक्षारक्षकांना सूचना दिल्या आहेत, तसेच पर्यटकांनी समुद्रात अंघोळीसाठी जाऊ नये, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.पुढील ३ दिवस किनारपट्टी भागात वादळी वार्‍यासह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. शिवाय समुद्रात १०५ ते १५० किलोमीटर वेगाने, तर किनारपट्टीवर प्रतिघंटा ५० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वहाणार आहेत. लाटांच्या उंचीत देखील वाढ होणार असल्याने प्रशासनाकडून मासेमार, पर्यटक आणि नागरिक यांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाऊससावंतवाडी – सिंधुदुर्ग जिल्ह्यात १० जून या दिवशी पहाटे आणि सकाळी १० वाजण्याच्या सुमारास कुडाळ, सावंतवाडी, बांदा, कणकवली आदी ठिकाणी पाऊस पडला. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या सिंधुदुर्गवासियांना काहीसा दिलासा मिळाला. असे असले, तरी पहिल्याच पावसाने नागरिकांची काही प्रमाणात तारांबळ उडाली.

दक्षिण-पश्‍चिम मोसमी पाऊस पुढे अरबी समुद्राच्या मध्यात, कर्नाटकच्या काही भागांत, गोवा राज्यात, महाराष्ट्रातील काही भागात, तमिळनाडूच्या काही भागांत, बंगालच्या खाडीत, ईशान्येकडील काही राज्ये आणि सिक्कीम या ठिकाणी सरकण्यासाठी हवामान अनुकूल बनले आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मोसमी पाऊस १० जून या दिवशी गोवा वगळता इतर काही भागांत पोचला होता. गोव्यातही सकाळी आणि सायंकाळी मोसमी पावसाप्रमाणेच पाऊस कोसळला.हवामान विभागाने ११ जूनपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला ते गोव्यातील वास्को या किनारी भागात बीपर जॉय चक्रीवादळामुळे साडेतीन मीटर ते ४.१ मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस मासेमारांनी समुद्रात न जाण्याची सूचना केली आहे. अरबी समुद्रात उत्तर-पूर्व भागात असलेले हे चक्रीवादळ ७ किमी प्रतिघंटा या वेगाने उत्तरेकडे सरकले आहे. पुढील २४ घंट्यांत त्याची तीव्रता वाढणार असून ते उत्तर-उत्तरपूर्व भागात सरकणार आहे आणि नंतर पुढील ३ दिवसांत ते उत्तर-उत्तरपश्‍चिम भागात सरकणार आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.