कुडाळ प्रतिनिधी: गुढीपूर पिंगुळी येथील ट्रक टर्मिनस येथे रिक्षा व कार यांच्यात झालेल्या अपघातात रिक्षाचालक शिवाजी सत्यवान वराडकर ५० रा. केळूस हा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात सायंकाळी ४ वा.च्या सुमारास घडला असून यातील जखमी रिक्षा चालकाला ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात अधिक उपचारासाठी हलविण्यात आले आहे. यातील कार चालक हे कणकवलीच्या दिशेने जात होता. यावेळी ट्रक टर्मिनस येथील हॉटेल आईची ईच्छा येथे दुसऱ्या लेनमधून येत असलेल्या रिक्षाचालक शिवाजी वराडकर याने अचानक रिक्षा समोरील मिडलकट येथे वळवण्याचा प्रयत्न केला. रिक्षा अचानक समोर आल्याने कारचालकाने त्याला वाचवण्यासाठी आपली कार डिव्हाडरवर चढवली. मात्र तरीही रिक्षाला काहीशी ठोकर बसली. यात रिक्षाचालकाच्या एका पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालय ओरोस येथे हलविण्यात आले आहे. या अपघातात रिक्षाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.