Home स्टोरी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आजाराबाबत हलगर्जीपणा न करता तात्काळ आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा! डॉ....

पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आजाराबाबत हलगर्जीपणा न करता तात्काळ आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा! डॉ. महेश खलिपे यांचे आवाहन

47

२९ जून वार्ता: पावसाळ्यात उद्भवणाऱ्या लेप्टोस्पायरोसिस, मलेरिया, डेंग्यू याबरोबर अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ, हगवण, विषमज्वर इत्यादी साथीच्या आजाराबाबत आरोग्य यंत्रणेमार्फत आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. कोणत्याही प्रकारच्या तापाबाबत हलगर्जीपणा न करता तात्काळ आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी केले आहे. भातशेतीच्या हंगामात काम करणाऱ्या व्यक्तींनी अंगावर जखम असल्यास जखमेला बॅन्डेज करावे. ब्लीचिंग पावडरने निर्जंतुक केलेले किंवा उकळून शुद्ध केलेलेच पाणी पिण्यासाठी वापरावे. उंदीर, घुशी यांचा नायनाट करावा. सर्व ताप सणांनी त्यांना देण्यात येणारा औषधोपचार नियमित व वेळेवर सेवन करावा. नियमित ताजे व गरम अन्न खावे. शौचाहून आल्यावर व जेवणापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवावे. तापाचे निदान रक्त व लघवी याची तपासणी करून करता येते. जिल्ह्यात संशयीत तापाच्या रुग्णांच्या रक्ताची व लघवीची तपासणी करून निदान करण्याची सोय जिल्ह्यातील सर्वउपजिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्गनगरी येथे उपलब्ध आहे.

पूरग्रस्त गावामधील व संपर्क तुटणाऱ्या गावामधील गर्भवती महिलांना त्यांच्या EDD नुसार चार ते पाच दिवस अगोदर दवाखान्यात दाखल होणे आवश्यक आहे.दरम्यान, आपले घरात अगर शेजारी तीव्र ताप, अंगदुखी, थंडी वाजणे, लघवी पिवळी होणे, लक्षणांचा रुग्ण असल्यास अशा रुग्णास त्वरित नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, तसेच जिल्हा रुग्णालय येथे उपचार घेण्यास दाखल करावे. मात्र, बऱ्याचवेळा रुग्णांची लक्षणे ही किरकोळ स्वरुपाची व न समजून येणारी असतात. त्यामुळे किरकोळ ताप असल्यास अंगावर तोलू नये, त्वरित उपचार घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे..