मसुरे प्रतिनिधि: (पेडणेकर): सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी संध्याकाळी उशिरा दक्षिण कोकणची काशी आणि नवसाला पावणाऱ्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्रीदेवी भराडी मातेच्या मंदिरास भेट देऊन श्रीदेवी भराडी मातेचे आशीर्वाद घेतले. यावेळी आंगणे कुटुंबीयांनी श्री देवी भराडी मातेच्या चरणी नामदार रवींद्र चव्हाण यांच्या साठी विधिवत गाऱ्हाणे घालून मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे यांच्या हस्ते त्यांचा रुदय सत्कार करण्यात आला. यावेळी येथील विविध विकास कामे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंजूर करून आगणेवाडीच्या विकासात मोलाचा हातभार लावलेला आहे. तसेच आंगणेवाडी यात्रा उत्सव काळात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करून होऊ घातलेली विकास कामेही तातडीने होण्यासाठी प्रयत्न करत असल्याबाबत आंगणे कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले. तसेच उर्वरित विकास कामांबरोबर ग्रामस्थांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासोबत चर्चा केली. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आजपर्यंत केलेल्या कामामुळे आंगणेवाडी परिसरातील सर्व रस्ते आणि विविध विकासात्मक कामे पूर्ण झालेली असल्यामुळे समाधान व्यक्त केले. त्यांच्या पुढील वाटचालीसही आगणे परिवाराने त्यांना शुभेच्छा दिल्यात.
मसुरे डांगमोडे ग्रामपंचायतीचे विभाजन होऊन नवीन तीन ग्रामपंचायत अस्तित्वात आल्या परंतु पूर्वीच्या मसुरे डांगमोडे ग्रामपंचायतचे नाव बदलून मर्डे ग्रामपंचायत नाव झाले. याबाबत प्रशासनाच्या चुकीमुळे कोणतीही मागणी नसताना प्रशासनाने या ग्रामपंचायतीचे मर्डे असे नामकरण केले. याबाबत मसुरे ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली होती. मसुरे ग्रामस्थांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते उद्योजक डॉक्टर दीपक मुळीक परब यांनी वेळोवेळी सर्व संबंधितांचे लक्ष वेधले होते. गेली दोन वर्ष डॉक्टर दीपक परब हे या संदर्भात प्रशासनाकडे वेळोवेळी न्याय मागत आहे. प्रशासनाने केलेली चूक ही मसुरे ग्रामस्थांच्या माथी मारली गेली आहे. ऐतिहासिक मसुरे हे नाव प्रशासनामुळे आज पुसले गेले आहे. ग्रामस्थांची कोणतीही मागणी नसताना प्रशासनाने ही चूक केली असून आता हे नाव बदलण्यासाठी चालढकलपणा होत आहे. दीपक परब यांनी वेळोवेळी ग्रामसभेचे ठराव, लागणारी सर्व कागदपत्रे प्रशासनाकडे देऊनही अद्याप पर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. याबाबत पुन्हा एकदा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना मसुरे ग्रामविकास संघ मुंबई आणि मसुरे ग्रामस्थ यांच्या वतीने आंगणेवाडी येथे दीपक परब, दत्तप्रसाद पेडणेकर यांनी निवेदन देऊन मसुरे हे नाव ग्रामपंचायत लागावे या साठी लक्ष वेधले आहे.
मसुरे गावच्या नावाबाबत आणि येथील इतर सर्व विकासात्मक कामाबाबत आपण योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी यावेळी दिली. यावेळी आंगणेवाडी विकास मंडळाचे अध्यक्ष भास्कर आगणे, काका आगणे, बाळा आंगणे, छोटू आंगणे, सतीश आंगणे, बाबू आंगणे, शांताराम आंगणे, बाब्या आंगणे,नंदू आंगणे, प्रकाश आंगणे, अनंत आंगणे, दीपक आंगणे, रघुनाथ आंगणे, समीर आगणे, जयेश आंगणे, गणेश आंगणे,किर्तिराज आंगणे आणि आंगणेवाडी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी भास्कर आंगणे, बाळा आंगणे, काका आंगणे, बाबू आगणे यांनी विविध विकासात्मक प्रश्नाबाबत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्ष वेधले.कॅप्शन ..आंगणेवाडी श्रीदेवी भराडी मंदिर येथे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा सत्कार करताना मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे आणि सोबत काका आगणे, बाबू आंगणे, अनंत आंगणे, बाब्या आंगणे आणि मान्यवर.