मालवण: बिळवस हायस्कूल ते कुंबळ तिठा पर्यंत गेली कित्येक वर्ष स्ट्रीट लाईटची मागणी सडेवाडी ग्रामस्थांची होती. यासाठी श्री.विवेक पालव यांनी मंत्रालय पातळीवरून पत्रव्यवहार केला होता. तसेच स्थानिक ग्रामस्थांची गेली कित्येक वर्ष मागणी होती. यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेकडे सातत्याने पाठपुरावा चालू होता. आत्ताच आंगणेवाडी जत्रेपूर्वी आमदार वैभव नाईक यांच्या सहकार्याने महावितरणचे कार्यकारी अभियंता यांची भेट घेऊन स्ट्रीट लाईटचे काम मार्गी लावले. यासाठी ग्रामसेवक, श्री. युगलकिशोर प्रभुगावकर यांनी मोलाचे सहकार्य केले. मात्र काही नेते मंडळी फुकटचे श्रेय लाटण्यासाठी पालकमंत्री आणि खासदार निलेश राणे यांनी काम केल्याचे बातम्या टाकत आहेत. पालक मंत्र्यांना आणि खासदार राणेंना बिळवस गाव आहे हे तरी माहीत आहे का? असा सवाल उध्वव ठाकरे गटाचे युवासेना विभाग प्रमुख मसुरे राहुल सावंत यांनी केला आहे.
मालवण तालुक्यातील बिळवस गावातील धाकूधाम ते बिळवस हायस्कूल या मुख्य रस्त्यावरील स्ट्रीट लाईटचे काम पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आले आहे. गेली अनेक वर्ष येथील ग्रामस्थांची या रस्त्यावरील स्ट्रीट लाईटची मागणी पूर्ण झाल्याने बिळवस ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे. अशी बातमी प्रसारमाध्यमांवर प्रसारित झाली आहे. या बातमीबाबत खुलासा करत ठाकरे गटाचे युवासेना विभाग प्रमुख मसुरे राहुल सावंत यांनी आक्रमक भूमिका घेत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
राहुल सावंत पुढे म्हणाले की, आत्ताचे पालकमंत्री एकदातरी कधी बिळवस मध्ये आलेत काय? किवा इथल्या नेत्यांनी विकास कामांसाठी एकदा तरी इथे आणले काय? खासदार नारायण राणेंनी बिळवस ग्रामपंचायत दत्तक घेतली होती. त्यांनी किती विकास निधी बिळवस साठी दिला? तो पहिला जाहीर करावा. पाच वर्षात किती वेळा इकडे फिरकले? ते सांगावे आणि मगच त्यांची मोठेपणा सांगावा. स्ट्रीट लाइटचे काम हे आमच्या सततच्या पाठपुराव्यामुळे झालेलं असून गावचा प्रथम नागरिक म्हणून सरपंचाचे हस्ते त्याचे उद्घाटन केले आहे आणि फुकट मिळालेल्या खुर्चीवर बसलेल्या सरपंच ने आज पर्यंत काय केले ते जाहीर करावे. असं उध्वव ठाकरे गटाचे युवासेना विभाग प्रमुख मसुरे यांनी म्हटलं आहे.