८ मे वार्ता: भारताने ७ मे रोजी रात्री १:३० च्या सुमारास ला ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान येथील दहशतवाद्यांच्या ९ ठिकाणांवर हल्ला केला. यानंतर पाकिस्तानने बुधवारी सीमारेषेवर गोळीबार केला. या गोळीबारामध्ये भारतीय सैन्यातील जवान दिनेश कुमार शहीद झाले. पाकिस्तानी सैन्याने बुधवारी सकाळी सीमारेषेवर गोळीबार केला. भारतीय सैन्याने याला चोख प्रत्युत्तर दिले. मात्र, यादरम्यान सैन्याचे जवान दिनेश कुमार शर्मा हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते, उपचारादरम्यान संध्याकाळी उशिरा त्यांचे निधन झाले. लान्स नायक दिनेश कुमार शर्मा हे मूळचे हरयाणातील पलवाल येथील रहिवासी होते. याबाबत हरयाणाचे मुख्यमंत्री नायबसिंह सैनी यांनी X वर पोस्ट केली आहे. ते म्हणतात, ऑपरेशन सिंदूरनंतर आज सकाळी जम्मूतील पूंछ येथे पाकिस्तान सैन्याच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना हरयाणातील पलवालचे सुपूत्र दिनेश कुमार शर्मा यांनी बलिदान दिले. तुम्ही दाखवलेल्या शौर्यावर देशाला अभिमान आहे. तुमच्या बलिदानाला हा देश कधीही विसरणार नाही.