Home शिक्षण पशुसंवर्धनच्या परीक्षेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात परीक्षा केंद्र नाही!

पशुसंवर्धनच्या परीक्षेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात परीक्षा केंद्र नाही!

60

बेरोजगारांना दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन द्यावी लागणार परीक्षा.

मसुरे प्रतिनिधी:(पेडणेकर): शासनाच्या वतीने पुणे पशुसंवर्धन विभाग येथे “पशुधन पर्यवेक्षक, वरिष्ठ लिपीक, लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, तारतंत्री, तांत्रिकी आणि बाष्पक परिचर” पदांच्या ४४६ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. परंतु इतर जिल्ह्याच्या परीक्षार्थी उमेदवारांना त्यांच्या जिल्ह्यात परीक्षा देता येणार असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मात्र परीक्षा केंद्र देण्यात आले नसल्याचे माहिती पत्रकावरून दिसून येत आहे. आयबीपीएस या एजन्सी कडून ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परीक्षार्थी उमेदवारांना रत्नागिरी, कोल्हापूर सारख्या दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन परीक्षा देण्यासाठी पदरमोड करावी लागणार आहे.

एकतर परीक्षा फी खुल्यागटा साठी १ हजार व मागासवर्गीय गटासाठी ९०० रुपये ठेवण्यात आली आहे. त्यात परीक्षेसाठी दुसऱ्या जिल्ह्यात जाताना वाढीव खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी याबाबत त्वरित या विभागाचे लक्ष वेधून सिंधुदुर्ग साठी परीक्षा केंद्र मंजूर करणे आवश्यक आहे. आयबीपीएस यांनी दोन महिन्यांपूर्वी शिक्षक अभियोग्यता परीक्षा ऑनलाइन पद्धतीने जिल्ह्यातील विविध केंद्रांवर घेतली होती. त्यामुळे पुरेशी परीक्षा केंद्र जिल्ह्यात उपलब्ध असताना या परीक्षेसाठी जिल्ह्यात केंद्र नसणे ही बाब खेद जनक असल्याचे स्पष्ट होत आहे. अर्ज करण्याची ऑनलाईन लिंक सुरु झाली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ जून २०२३ आहे. त्यामुळे याबाबत लोकप्रतिनिधींनी तातडीने पाऊले उचलून जिल्ह्यातील बेरोजगार युवकांवर होणारा अन्याय दूर करण्याची मागणी होत आहे.