११ जानेवारी वार्ता: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मालदीव ऐवजी लक्षद्विप अशी साद घातली ती देशातील भुरळ पडणारे नितांत रम्य सागरी किनारे व तेथील पर्यटन विकासासाठी. आपल्या महाराष्ट्रालाही सुंदर, समृद्ध स्वर्गीय सागरी किनारा लाभला आहे या ठिकाणच्या पर्यटन वाढीला प्रोत्साहन द्यावे यासाठी सर्व पर्यटन कंपन्यानी विशेष भर द्यावा असे आवाहन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी केले आहे.
आपल्या कोकणात अशी अनेक गावे आणि सागरी किनारे पर्यटकांना आकर्षित करणारे आहेत. केवळ तारकर्ली, गणपती पुळे, मुरुड जंजिरा, दिवे आगार, अलिबागच नव्हे तर भांडार पुळे असो की भोगवे, वेणेश्वर, अंजर्ली, दाभोळी, देवगड, कोंडुरा, कळशी , रेवदांडा, असे अविस्मरणीय अनुभव देणारे अनेक सागर किनारे आहेत. महाराष्ट्रातील व देशातील पर्यटकांनी आवर्जून अनुभवण्यासारख्या या सागर किनाऱ्यांना जरूर भेटी द्याव्या आणि कोकणातील व पर्यायाने महाराष्ट्रातील पर्यटन व्यवसायाला प्रोत्साहन द्यावे असे आवाहन महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी केले आहे.
कोकण विभाग हायवे रेल्वे विमान वाहतूक व जल वाहतुकीने संपूर्ण देशाशी जोडला गेलेला असल्याने केवळ आपण स्वतः न जाता आपल्या वर्तुळातील सर्व देशपरदेशातील प्रतिनिधी आणि मित्रमंडळी या नितांत रम्य सागर किनारी जातील यासाठीही प्रयत्नशीलराहावे असेही त्यांनी सांगितले.