Home स्टोरी पर्यटकांची लूटमार आणि फसवणूक प्रकरणी गोवा पोलीस आणि पर्यटन खाते यांची संयुक्त...

पर्यटकांची लूटमार आणि फसवणूक प्रकरणी गोवा पोलीस आणि पर्यटन खाते यांची संयुक्त कारवाई

88

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: गोवा पोलीस आणि पर्यटन खाते यांनी २८ एप्रिल या दिवशी संयुक्तपणे कारवाई करतांना कळंगुट परिसरातील समुद्रकिनार्‍यांवर येणार्‍या पर्यटकांची लूटमार आणि फसवणूक करणार्‍या दलालांवर कारवाई केली. या वेळी एकूण २८ दलालांना कह्यात घेण्यात आले आहे. उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांच्या नेतृत्वाखाली, तसेच पर्वरीचे उपअधीक्षक विश्वेश कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत वाळपई, आगशी, तसेच कोलवाळ पोलीस ठाण्यांच्या निरीक्षकांनी सहभाग घेतला, तसेच यात कळंगुटसह डिचोली, वाळपई आणि इतर पोलीस ठाण्यांतील ६० हून अधिक पोलिसांचा समावेश होता. या कारवाईसाठी पोलिसांच्या विशेष पथकाची स्थापना करण्यात आली होती.

१. प्रारंभी कळंगुट परिसरातील विविध भागांतील दलालांवर देखरेख ठेवण्यासाठी या सर्व पोलिसांना साध्या वेशात मोक्याच्या ठिकाणी नेमण्यात आले होते. २८ एप्रिल या दिवशी सकाळी चालू झालेली ही मोहीम रात्री उशिरापर्यंत चालू होती. या वेळी कळंगुट परिसरात येणार्‍या पर्यटकांना स्वत:कडे आकर्षित करून त्यांना विविध प्रकारची आमिषे दाखवण्याचा प्रयत्न करणार्‍या सर्व दलालांना कह्यात घेण्यात आले.

२. कह्यात घेतलेले अधिकतर दलाल हे कर्नाटक, आसाम, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, नेपाळ, राजस्थान, ओडिशा, हरियाणा, उत्तराखंड, मेघालय या राज्यांतील आहेत. या दलालांच्या विरोधात पर्यटन व्यवसाय कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यानंतर पुढील कार्यवाहीसाठी दलालांना पर्यटन खात्यात उपस्थित करण्यात आले.

३. पर्यटन खात्याच्या संचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्यटकांना लुबाडणार्‍या या दलालांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. कायद्यात त्यांना ५ सहस्र ते ५० सहस्र रुपयांपर्यंतचा दंड निश्चित केलेला आहे. पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन म्हणाले, ‘‘गोवा पोलिसांनी गतवर्षी ४०० दलालांवर कारवाई केली होती, तर चालू वर्षी आतापर्यंत १०० दलालांवर कारवाई करण्यात आली आहे.’’ कळंगुट, कांदोळी, बागा, सिकेरी या किनारी भागांत दलालांकडून पर्यटकांच्या होणार्‍या फसवणुकीसंबंधीच्या अनेक तक्रारी प्रविष्ट झाल्या आहेत. स्थानिक नागरिक आणि पर्यटन व्यावसायिक यांनी या दलालांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. स्थानिक पंचायतीकडून मुख्यमंत्री, पर्यटनमंत्री आणि पोलीस महासंचालक यांना कारवाई करण्यासंबंधी निवेदन सुपुर्द करण्यात आले आहे. अशा प्रकारची कारवाई यापुढेही चालूच रहाणार असल्याचे वरिष्ठ पोलीस आणि पर्यटन खात्याचे अधिकारी यांनी सांगितले आहे.