२२ जून वार्ता: संगमनेर जिल्हा अहिल्यानगर येथील एका तरुणीची २ वर्षांपूर्वी ‘पबजी गेम’ खेळत असताना बिहार येथील अक्रम शेख याच्याशी ओळख झाली होती. तो संगमनेरच्या मालपाणी रिसोर्ट येथे मित्र महंमद नेमतुल्ला महंमद कैसर याच्यासह आला होता. भेटीच्या वेळी अक्रमने तिला ‘ माझ्यासोबत बिहारला चल, आपण लग्न करू’ असा आग्रह धरला., मुलीने त्यास नकार दिला; मात्र अक्रम आणि नेमतुल्ला यांनी ‘तुला यावेच लागेल, नाही तर तुझ्या घरी येऊन तुझी अपकीर्ती करू’, अशी धमकी दिली. पीडितेने पोलिसांत तक्रार केल्यानंतर आरोपीला अटक करून त्याचा भ्रमणभाष जप्त करण्यात आला.
या वेळी आरोपी ३१ मुलींच्या संपर्कात असल्याची माहिती अन्वेषणात समोर आली आहे. अजून किती मुलींना आरोपीने फसवले आहे ? याचे अन्वेषण पोलीस करत आहेत. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंद करून दोघांना अटकही केली आहे.आरोपी बिहार राज्यातून संगमनेरमध्ये कुणाच्या साहाय्याने आले ? यात कुणी साथीदार आहेत का ? याचा शोध पोलीस घेत आहेत. सध्या ‘लव्ह जिहाद’ प्रकाराची शहरात चर्चा असल्याने या प्रकरणाकडे पोलिसांनी गांभीर्याने लक्ष केंद्रित केले आहे; मात्र ‘हा प्रकार लव्ह जिहादचा नाही’, असा खुलासा उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी पत्रकार परिषदेत केला.