मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या १४१ व्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात होतेय. या अधिवेशनाचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे.भारतात ही बैठक दुसऱ्यांदा होत आहे. याधीची बैठक सुमारे ४० वर्षांपूर्वी झाली होती. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे ८६ वे सत्र, नवी दिल्लीत १९८३ साली झाले होते. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई विमानतळावर पोहोचले आहेत. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी विमानतळावर राज्यपाल रमेश बैस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार उपस्थित होते. मुंबई विमानतळा बाहेरील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील मुख्य रस्ता आता सामान्य नागरिकांसाठी बंद करण्यात आला असून पंतप्रधान मोदी हे वांद्रे येथील कार्यक्रमासाठी रवाना झाला आहेत. या सत्राला, आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाच आणि इतर सदस्य उपस्थित असतील. त्याशिवाय भारतातील क्रीडा क्षेत्रातील महत्वाच्या व्यक्ती आणि भारतीय ऑलिंपिक संघटनेसह विविध क्रीडा महासंघाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे.