Home स्टोरी पंतप्रधान नरेंद्र मोदिंसह अनेक मंत्री आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात….!

पंतप्रधान नरेंद्र मोदिंसह अनेक मंत्री आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात….!

170

मालवण: नौदल दिन आणि ‘राजकोट’ येथील शिवपुतळ्याचे अनावरण या कार्यक्रमांची सर्व सिद्धता पूर्ण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह अनेक मंत्री अन् मान्यवर येणार असल्याने सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यामुळे या परिसराला पोलीस छावणीचे रूप आले आहे. सर्वांची उत्कंठा शिगेला पोचलेला हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्वांच्या स्वागतासाठी प्रशासकीय यंत्रणेसह मालणवासीय सज्ज झालेमालवण येथे नौदल दिन साजरा करण्याचा निर्णय झाल्यानंतर गेले २ मास सर्व प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यापासून रस्ते, पाणी, वीज आदी सर्व सोयीसुविधा करण्यात आल्या आहेत. येथील शासकीय विश्रामगृहाची दुरुस्ती करून ते अद्ययावत करण्यात आले आहे. पोलीस बंदोबस्त

सोहळ्यासाठी राज्यातून पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, उपअधीक्षक, निरीक्षक, साहाय्यक निरीक्षक, पोलीस अंमलदार, वाहतूक पोलीस, राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या, दंगल नियंत्रक पथके, असे एकूण ३ सहस्रांहून अधिक पोलीस बळ येथे तैनात करण्यात आले आहे. कुंभारमाठ, देऊळवाडा, बसस्थानक, भरडनाका, तारकर्ली नाका, बोर्डिंग मैदान, वायरी-भूतनाथ, तारकर्ली येथे होणार्‍या मुख्य कार्यक्रमाचा परिसर येथे हा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यासह नौदलाच्या वतीनेही सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. परिसरात २२ अग्निशमन बंब सिद्ध ठेवण्यात येणार आहेत.

असा होणार कार्यक्रम….!

पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी ४.१५ वाजता मालवण (सिंधुदुर्ग) येथे पोचतील आणि तेथील राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करतील. त्यानंतर सायंकाळी तारकर्ली येथील महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या (एम्.टी.डी.सी.च्या) केंद्रावर नौदल दिनाचा मुख्य कार्यक्रम होणार आहे. येथे पंतप्रधानांचे आगमन झाल्यावर स्वागत आणि त्यानंतर नौदलाचे स्मृतीचिन्ह त्यांना भेट दिले जाणार आहे. युद्धनौका, हेलिकॉप्टर, विमाने, नौदलाचे जवान यांच्याद्वारे नौदलाच्या शक्तीसामर्थ्याचे प्रदर्शन केले जाणार आहे. त्यानंतर मान्यवरांची भाषणे होऊन शेवटी पंतप्रधान मोदी यांचे भाषण होणार आहे. या वेळी नौदलाचा ध्वज आणि भारताचा तिरंगा फडकावला जाणार आहे. नौदलाच्या नौकांवर आणि सिंधुदुर्ग किल्ल्यावर या निमित्ताने रोषणाई केली जाणार आहे. या वेळी सिंधुदुर्ग किल्ल्यावरून ‘लेझर शो’ सादर केला जाणार आहे.

 

सर्वसामान्यांना कार्यक्रम पहाता यावा, यासाठी विशेष नियोजन….!

हा कार्यक्रम सर्वांना पहाता यावा, यासाठी प्रशासनाने तारकर्ली आणि दांडी येथे ‘एल्.ई.डी.’ स्क्रीनद्वारे कार्यक्रमाचे प्रक्षेपण करण्याचे नियोजन केले आहे.

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून २६६ एस्.टी. बसची सोय….!

नौदल दिनाचा कार्यक्रम पहाण्यासाठी एस्.टी. प्रशासनाकडूनही नियोजन करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध आगारांतून एस्.टी.च्या २६६ बसगाड्या या सोहळ्यासाठी सोडण्यात येणार आहेत. शहरातील दांडी आवार या ठिकाणी सर्वच्या सर्व गाड्या थांबवण्यात येणार असून, तेथून सर्व प्रवाशांना भव्य मंडपात बसून कार्यक्रम पहाण्याची संधी मिळणार आहे. सुमारे ५० सहस्र नागरिक या कार्यक्रमात सहभागी होण्याची शक्यता गृहित धरून प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.