सिंधुदुर्ग प्रतिनिधी: कुडाळ- मालवण मार्गावर नेरूर जकात ते श्री देव नागदा मारूती मंदिर दरम्यानच्या पुलाचा काँक्रिटचा काही भाग पावसाने कोसळला. तसेच दोन ते तीन फूट रस्ताही खचला असल्याने या मुख्य मार्गावरील वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. सध्या तेथे एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. परंतू अवघड वाहतूक बंद होण्याची भिती निर्माण झाली आहे. नेरूर सरपंच सौ. भक्ती घाडी, माजी सरपंच शेखर गावडे, ओबीसी सेल जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर, समद मुजावर, बाळा पावसकर, अजित मार्गी, राजन पावसकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तसेच सा.बां.विभागाच्या अधिका-यांशी संपर्क साधून माहीती दिली. परंतू अधिकारी घटनास्थळी न फिरकल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचा-यांनी काही वेळाने धाव घेत पाहणी केली.
या पुलाची संरक्षक भिंत कोसळून रस्ताही खचला आहे. त्यामुळे पुलाला धोका निर्माण झाला आहे. सध्या या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. सा.बां.उपविभागाच्या उपअभियंता यांच्याशी संपर्क साधून याबाबतची माहीती देण्यात आली असून त्यांनी येत्या आठ दिवसांत या ठिकाणी उपाययोजना करण्याची ग्वाही दिली आहे. सध्या तात्पुरत्या स्वरूपात रस्त्यावर बॅरल उभे करून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली असल्याचे माजी सरपंच शेखर गावडे यांनी सांगितले.