यूट्यूबर झिशान मुश्ताक हा पाकच्या सरकारी इंटरनेट सेवेचा वापर करून प्रसारित करत होता भडकावणारे व्हिडिओ !
नूंह (हरियाणा): येथे मुसलमानांनी घडवलेल्या हिंसाचाराचा संबंध आता पाकिस्तानशी असल्याचे निष्पन्न होत आहे. हरियाणा पोलीस हिंसाचाराशी संबंधित २ सहस्र ३०० व्हिडिओजचे अन्वेषण करत आहे. अशातच पाकिस्तानी यूट्यूबर झिशान मुश्ताक हा ‘अहसान मेवाती’ नावाच्या यूट्यूब चॅनलवरून नूंह येथील मुसलमानांना भडकावत असल्याचे समोर आले आहे. या चॅनलवरून त्याने बजरंग दलचा कार्यकर्ता मोनू मानेसर याला मारण्याची धमकीही दिली होती.झिशानने ३१ जुलै या दिवशी झालेल्या दंगलीचे व्हिडिओ त्याच दिवशी फेसबुक आणि यूट्यूब यांवरून पोस्ट केले होते. यातून त्याने नूंहमध्ये मोठ्या प्रमाणात संपर्कयंत्रणा निर्माण केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. त्याचे सर्व व्हिडिओ पाकच्या बहावलपूर येथून प्रसारित झाल्याचे समोर येत आहे. अहसान मेवाती या यूट्यूब चॅनलचे ८० सहस्र सदस्य असून ८५ लाखांपेक्षा अधिक वेळा त्याचे व्हिडिओ पाहिले गेले आहेत. अहसानने फेसबुकवर तो राजस्थानच्या अलवर येथील रहिवासी असल्याचे लिहिले आहे.३१ जुलै या दिवशी झिशानने त्याचे व्हिडिओज इस्लामाबाद येथील ‘पाकिस्तान एज्युकेशन अँड रिसर्च नेटवर्क’ या पाक सरकारच्या इंटरनेट सेवेचा उपयोग करून प्रसारित केल्याचेही समोर येत आहे. या व्यवस्थेद्वारे पाकमधील शैक्षणिक संस्थांना इंटरनेट पुरवले जाते.