सिंधुदुर्ग प्रतिनिधी: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्तीच्या निर्णयावर फेरविचार करणार आहे, असे संकेत दिले आहेत. त्यांच्या निर्णयाला पक्षातून तीव्र विरोध होत आहे. कार्यकर्त्यांनी यशवंतराव चव्हाण सेंटर या कार्यक्रमस्थळीच ठिय्या मांडत या निर्णयाला विरोध केला. नेते आणि कार्यकर्ते यांनी शरद पवार यांनी त्यागपत्र मागे घेण्याचे साकडे घातले; मात्र पवार आपल्या भूमिकेवर ठाम राहिले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे-पाटील यांनी शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. कार्यकर्त्यांच्या भावना त्यांच्यासमोर मांडल्या. तेव्हा निवृत्तीच्या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी २-३ दिवस द्या, असे आवाहन त्यांनी केले. कार्यकर्ते शांत झाले, तरच हा फेरविचार करू, असा निरोपही त्यांनी अजित पवार यांच्याद्वारे कार्यकर्त्यांना पोचवला. शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर अजित पवार यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.