४ ऑक्टोबर वार्ता: देशात पुढच्या वर्षी लोकसभेची निवडणूक पार पडणार आहे. त्यानंतर लगेच काही महिन्यांनी विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकांआधी आणखी एक महत्त्वाची निवडणूक पार पडणार आहे.राज्य निवडणूक आयोगाकडून या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. राज्यभरातील 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि 2 हजार 950 सदस्यपदाच्या; तर 130 सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी 5 नोव्हेंबर 2023 या दिवशी मतदान होणार आहे. याबाबतची घोषणा स्वत: राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली आहे.
या निवडणुकीसाठी उमेदवारांना नामनिर्देशनपत्रे 16 ते 20 ऑक्टोबर 2023 या कालावधीत दाखल करता येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी 23 ऑक्टोबर 2023 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 25 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल”, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली.*
5 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी 06 नोव्हेंबर 2023 रोजी होईल. मात्र गडचिरोली आणि गोंदिया या नक्षलग्रस्त भागात सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. तेथे 7 नोव्हेंबर 2023 रोजी मतमोजणी होईल, असं यू. पी. एस. मदान यांनी सांगितलं.
ग्रामपंचायत निवडणुकीला महत्त्व…..
निवडणूक आयोगाने जाहीर केलेली ही ग्रामपंचायत निवडणूक महत्त्वाची आहे. राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीआधी दरवेळी महत्त्वाच्या शहरांमधील महापालिका निवडणुका पार पडतात. पण यावेळी महापालिका निवडणुकीचा मुद्दा सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. महापालिका निवडणुकांना मिनी विधानसभा निवडणुका मानलं जातं. पण आता राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडत असल्यामुळे जनतेचा कल नेमका कुणाच्या बाजूने आहे ते ओझरत समजण्याची शक्यता आहे.