सावंतवाडी प्रतिनिधी: निरवडे ग्रामपंचायतच्या ग्रामसेविका सुनीता कदम यांना अपशब्द वापरल्याप्रकरणी लक्ष्मण मोहन गावडे (४३) व त्यांची पत्नी श्रीमती लक्ष्मण गावडे ( ४१, दोघेही रा. निरवडे माळकरवाडी ) यांच्यावर ॲट्रॉसिटी व सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या दोघांनीही ग्रामपंचायत येथे येऊन आपल्याला अपशब्द वापरून धमकी दिल्याची तक्रार ग्रामसेविका सुनिता कदम यांनी सावंतवाडी पोलिसांत शुक्रवारी दिली होती. शासकीय कामात ही दोघेही पती-पत्नी वारंवार आपल्याला त्रास देतात. शुक्रवारी ग्रामस्वच्छता कमिटी पाहणीच्या मुद्द्यावरून वादावादी करून त्यांनी अपशब्द वापरले अशी तक्रार त्यांनी दिली होती. त्यानंतर ग्रामसेवक संघटनांनी देखील पोलीस ठाण्यात धाव घेतली होती.
शनिवारी अखेर या दोघांवरही सावंतवाडी पोलिसांत ॲट्रॉसिटी व सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांवरही अटकेची कारवाई करण्यात आली आहे. याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी संध्या गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.