१० नोव्हेंबर वार्ता: राज्यातील निरक्षरांना साक्षर करण्यासाठी नवसाक्षरता अभियानाचे काम करणार्या शिक्षक संघटनांनी बहिष्कार घातला आहे. त्यामुळे आतापर्यंत राज्यातील केवळ ३४ सहस्र निरक्षरांचीच ऑनलाईन नोंदणी झाली आहे. नवसाक्षरता अभियानातील निरक्षरांच्या सर्वेक्षणाचे काम अशैक्षणिक असल्याचे सांगत शिक्षक संघटनांनी या कामाला विरोध केला. त्यामुळे ८ सप्टेंबरपासून या अभियानाचे काम राज्यात चालू होऊ शकले नाही.
निरक्षरांना साक्षर करणे, हे शैक्षणिकच काम असल्याचे अधोरेखित झाल्यानंतर शिक्षण विभागाने प्राथमिक शिक्षण संचालक, माध्यमिक शिक्षण संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद यांनी संयुक्त परिपत्रक प्रसिद्ध करून अभियानाचे काम न करणार्या अधिकारी कर्मचार्यांवर कारवाई करण्याची स्पष्ट चेतावणी दिली होती; मात्र अभियानाच्या कामाला गती मिळत नसल्याने उद्दिष्ट साध्य कसे करणार ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. अभियानातील निरीक्षरांना साक्षर करून त्यांची राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षण संस्थेच्या वतीने परीक्षा घेतली जाणार आहे.