सावंतवाडी प्रतिनिधी: गेले कित्येक दिवस नगरपरिषद समोर फुटपाथ ज्या ठिकाणी ट्रॅफिक पोलीस थांबतात त्या ठिकाणी एक खूप मोठा खड्डा होता. त्या फुटपाथ वरून सकाळच्या सत्रामध्ये मॉर्निंगवॉक साठी ये – जा करणारे ज्येष्ठ नागरिकांची नेहमी रहदारी असायची काही वेळा त्या ठिकाणी तीन अपघात देखील झाले होते अशी पोलिसांनी माहिती दिली तर याचीच दखल घेऊन सुशील चौगुले सावंतवाडी तालुका शहर प्रमुख माहिती अधिकारी व पोलीस मित्र सुमित (आबा) पिरणकर, मयूर सावंत, मनोज गुंजाळ व सुनील नाईक यांनी सामाजिक बांधिलकीचे सदस्य रवी जाधव यांना विनंती केली असता काल रात्री एकच्या सुमारास तो खड्डा सिमेंट काँक्रेट ने बुजवण्यात आला तसेच तीन मुशीकडील हॉस्पिटलच्या मार्गावर असलेला मोठा खड्डा देखील बुजवण्यात आला.


त्या खड्ड्यामध्ये आठ दिवसापूर्वी एका मोटरसायकल चालकाची मोटरसायकल जाऊन शॉकप्सर तुटून तो चालक रस्त्यावर पडला होता सुदैवाने त्याचा जीव वाचला. याचीही दखल घेऊन तोही खड्डा सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने बुजवला. याप्रसंगी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव, लक्ष्मण कदम, माहिती अधिकारी सुशील चौगुले व सामाजिक कार्यकर्ते प्रशांत मोरोजकर यांनी सहकार्य केले त्यांच्या या सेवाभावी कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.







