Home स्टोरी देशाच्या संरक्षणासाठी राष्ट्रभक्ती करा! गुरुमाऊली अप्पासाहेब मोरे

देशाच्या संरक्षणासाठी राष्ट्रभक्ती करा! गुरुमाऊली अप्पासाहेब मोरे

167

 

नाशिक प्रतिनिधी: देशाच्या संरक्षणासाठी आणि सैनिकांना संजीवनी मिळावी यासाठी सेवेकर्‍यांनी राष्ट्रभक्ती करावी, असा संदेश अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाऊली श्री. अण्णासाहेब मोरे यांनी दिला.

दिंडोरी प्रधान केंद्रात रविवारी १३ ऑगस्ट रोजी साप्ताहिक प्रश्नोत्तरे मार्गदर्शन आणि सत्संग समारोह राज्यभरातून आलेल्या सेवेकर्‍यांच्या अभूतपूर्व प्रतिसादामध्ये पार पडला. यावेळी गुरुमाऊलींनी सेवामार्गाच्या अठरा विभागांसह विविध विषयांवर मार्गदर्शन केले. गुरुमाऊली श्री. मोरे म्हणाले की, येणार्‍या स्वातंत्र्य दिनी सेवेकर्‍यांनी जवानांना संजीवनी मिळावी आणि देशाचे संरक्षण व्हावे या उद्देशाने सामुदायिक श्री स्वामीचरित्र, श्री दुर्गा सप्तशती आणि श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथांच्या पारायणात अवश्य सहभागी झाले पाहिजे. ही सेवा वैयक्तिक हिताबरोबरच राष्ट्रासाठी असल्यामुळे सेवेकर्‍यांनी स्वातंत्र्यदिनाबरोबरच प्रजासत्ताक दिनी ही सेवा करावी तसेच अब्जचंडीच्या सेवेतही सहभागी होऊन अपूर्ण असलेला गृहपाठ लवकरात लवकर पूर्ण करावा. आज पावतो ८५ कोटी श्री स्वामीचरित्राचे, श्री दुर्गासप्तशतीचे आणि रुद्राचे पाठ झाले आहेत अशी माहिती त्यांनी दिली. ग्राम अभियानावर बोलताना गुरुमाऊलींनी सांगितले की, जो सेवेकरी ग्राम अभियान राबवतो तो महाराजांना अधिक प्रिय आहे त्यामुळे ग्राम अभियान अधिक जोमाने राबवा असे आवाहन त्यांनी केले. स्वामींचे सेवेकरी होऊ इच्छिणार्‍यांनी दररोज अकरा माळा ‘श्री स्वामी समर्थ’ मंत्र तसेच श्री स्वामीचरित्राचे क्रमश: 3 अध्याय आणि पंचमहायज्ञ ही सेवा नियमितपणे केली पाहिजे असे गुरुमाऊलींनी स्पष्ट केले. तसेच आयुर्वेद, मराठी अस्मिता भारतीय संस्कृती, वास्तुशास्त्र, मूल्यसंस्कार, विवाह संस्कार, गर्भसंस्कार व स्वयंरोजगार आदी महत्त्वपूर्ण विषयांवरही त्यांनी मार्गदर्शन केले. सेवामार्गाच्या वास्तुशास्त्र विभागाच्या साहाय्याने विना तोडफोड घराचे घरपण जपा असे सांगताना त्यांनी उत्तम आरोग्यासाठी तसेच वैयक्तिक कौटुंबिक समस्यांवर मार्गदर्शन केले.