सिंधुदुर्ग: देवबाग येथे गुरुवारी पहाटे लागलेल्या आगीत रामचंद्र मधुसूदन सामंत यांच्या राहत्या घराचे संपूर्णतः नुकसान झाले. अकस्मात लागलेल्या या आगीमुळे श्री. सामंत यांच्या घरातील सर्व वस्तू आगीमध्ये बेचिराख झाल्या आहेत. त्याचप्रमाणे घराच्या छप्पराचे व भिंती कोसळून वित्तहानी झाली आहे. यांची माहिती मिळताच कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी घटनास्थळी भेट देत सामंत कुटुंबीयांच्या घराच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. सदर आग आटोक्यात आणताना गावातीलच श्री. लोणे हे आगीच्या ज्वालांनी जखमी झाले. श्री. लोणे यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, याबाबत जिल्हा शल्यचिकित्सकांशी संपर्क साधून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्याचप्रमाणे तलाठी श्री. राठोड यांना पंचनामा करण्याचे आदेश देऊन तहसीलदार महोदयांना झालेल्या नुकसानीचा जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्याबाबत चर्चा केली.
यावेळी मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, रमेश कद्रेकर, अनिल केळुसकर, राजू मेस्त्री, आबा केळुसकर, करण खडपे, सिद्धेश मांजरेकर, तलाठी श्री. राठोड आदी स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.