मसुरे प्रतिनिधी:(पेडणेकर): आपल्या आहारात पालेभाज्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पावसाळ्यामध्ये आपल्या परिसरात वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या तयार होत असतात. या रानभाज्यांची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी, त्यांचे आहारातील महत्त्व, आरोग्यदायक गुणधर्म विद्यार्थ्यांना कळावेत तसेच या भाज्यांची पाककृती पालकांकडून विद्यार्थ्यांना समजावी यासाठी प्राथमिक शाळा, मसुरे देऊळवाडा येथे रानभाज्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांच्या मदतीने आपल्या परिसरातील वेगवेगळ्या रानभाज्या या प्रदर्शनामध्ये मांडल्या होत्या. यामध्ये कुरडू, टाकळा, घोट्याचे वेल, शेवगा, पेवगा, अळंबी, सुरणाचापाला, अळू, फोडशी, कडिपत्ता, मोहरी, चवळीचा पाला, केळफूल अशा विविध भाज्यांचा समावेश होता.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. सदानंद कबरे, उपसरपंच श्री. नरेंद्र सावंत, भाऊ बागवे, निलेश लाड, संतोष काळसेकर, सीताराम लाकम, अत्रिनंदन परब, उन्नती मेस्त्री, सुप्रिया मेस्त्री, सेजल सावंत, गणेश बागवे, प्रमोद परब, बापूजी बागवे, समीर बागवे, रचना मेस्त्री, समीधा मेस्त्री, पल्लवी मेस्त्री, मोहन परब आणि पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. स्काऊट गाईडमधील *’खरी कमाई’* या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी या रानभाज्यांची उपस्थित पालक व ग्रामस्थ यांना विक्री केली. गणितामधील व्यवहारज्ञान, पैशांचा व्यवहार याचेही या निमित्ताने प्रात्यक्षिक घेण्यात आले. मुख्याध्यापक श्री.प्रशांत पारकर यांनी ‘पालेभाज्यांचे आहारातील महत्त्व‘ या विषयी मार्गदर्शन केले. स्काऊट मास्टर गुरुनाथ ताम्हणकर यांनी ‘खरी कमाई’ या उपक्रमांविषयी माहिती सांगितली. या प्रदर्शनाचे नियोजन उपशिक्षिका तेजल ताम्हणकर, कविता सापळे तसेच पोषण आहार मदतनीस अश्विनी सावंत व संपदा मेस्त्री यांनी केले. या उपक्रमाचे सूत्रसंचलन विद्यार्थी प्रतिनिधी नील बागवे, रुद्र परब व ध्रुवा परब यांनी केले.