Home स्टोरी दुष्काळसदृश परिस्थिती निवारणासाठी नवनाथ पारायण: गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे

दुष्काळसदृश परिस्थिती निवारणासाठी नवनाथ पारायण: गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे

111

 

नाशिक प्रतिनिधी: राज्यासह देशभरात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळ पडला तर आणखीनच भयानक परिस्थिती निर्माण होईल. त्याकरिता या परिस्थितीचे निवारण होऊन जनतेचे तसेच राष्ट्राचे संरक्षण व्हावे, सर्वत्र सौख्य ,शांती ,समाधान निर्माण व्हावे यासाठी श्री स्वामी सेवामार्गातर्फे श्रीगुरुपीठात ८ ‘९ ‘१० सप्टेंबर असे तीन दिवसीय नवनाथ भक्तिसार पारायण आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाऊली श्री अण्णासाहेब मोरे यांनी दिली.

दिंडोरी प्रधान क्षेत्री गुरुवारी ७ सप्टेंबर रोजी साप्ताहिक प्रश्नोत्तरे-मार्गदर्शन आणि सत्संग समारोह पार पडला. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पर्वावर झालेल्या सत्संगाला सेवेकऱ्यांची मोठी उपस्थिती होती. यावेळी गुरुमाऊलींनी सेवेकऱ्यांशी संवाद साधला. गुरुमाऊली म्हणाले की, महाभारतकारांनी भगवान श्रीकृष्णाला 26 पदव्या दिल्या असून आज देशभरामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडी उत्सव अपूर्व उत्साहात साजरा केला जात आहे. मात्र दुसरीकडे पावसाने पाठ फिरवल्यामुळे साऱ्या जनतेत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शेती धोक्यात आली असून हीच परिस्थिती निर्माण झाली तर पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो त्याकरिता श्री स्वामी सेवा मार्गातर्फे दुष्काळ सदृश परिस्थितीवर मात करण्यासाठी संकल्पित पर्जन्यसुक्तासह हवनात्मक नवनाथ पारायण व दत्त नवनाथ पूजन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या आध्यात्मिक सेवेमध्ये ज्यांना शक्य आहे त्यांनी अवश्य सहभागी होऊन श्रींच्या चरणी सेवा समर्पित करावी असे आवाहन त्यांनी केले. प्रत्येकाने आपल्या नित्यसेवेमध्ये पर्जन्यसुक्ताचे पठण करतानाच जलसंपत्तीचा काटकसरीने वापर करावा अशी सूचना त्यांनी केली.

श्रावण महिन्यात आपण नागदेवता, जलदेवता, श्रीकृष्ण नवरात्र आणि वृषभ नवरात्र साजरी करून बैलपोळ्याच्या दिवशी शिवपिंडीवर दहीभात लेपन करून श्रावण मासाच्या सेवेची सांगता करणार आहोत. भारतातल्या कुठल्याही ज्योतिर्लिंगामध्ये दहीभात लेपनाची सेवा होत नाही तर केवळ श्री स्वामी सेवाकेंद्रातच दहीभात लेपनाची सेवा होते असे त्यांनी स्पष्ट केले.

आपल्या अमृततुल्य हितगुजामध्ये गुरुमाऊलींनी मुलांचा हट्टीपणा, विवाह समस्या, व्यसनाधीनता, कर्जबाजारीपणा, वास्तुदोष, शेतीचे प्रश्न, कॅन्सरवरील आयुर्वेदिक उपचार याविषयी सविस्तर माहिती दिली तसेच रुद्रसुक्ताच्या तीर्थाचे महत्त्व, श्रीयंत्र, रुद्रयंत्र, कुबेर यंत्र व संरक्षण यंत्र, वादळ शमन ध्वज, गोमय गणेशमूर्ती, पौर्णिमेचे श्रीलक्ष्मीव्रत, पालखी सोहळ्याचे महत्त्व याविषयी सेवेकऱ्यांना मार्गदर्शन केले. सेवेकऱ्यानी कामिक सेवा करताना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा प्राधान्याने करावी व नंतर संकल्पित सेवा करावी तसेच अज्ञानी जगाला ज्ञानी बनवून तहहयात सेवेकरी बनविण्याचे व्रत अंगीकारावे आणि अध्यात्मिक सेवांच्या माध्यमातून सकारात्मक ऊर्जा अधिकाधिक वाढवावी असेही त्यांनी नमूद केले. गुरुमाऊलींच्या हितगुजानंतर पालखी सोहळ्यात सेवेकऱ्यानी अपूर्व उत्साहात सहभाग घेतला.