देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी!
मना सज्जना हेची क्रिया धरावी!
मना चंदनाचेपरी त्वां झिजावे!
परी अंतरी सज्जना नीववावे ||८||
अर्थ: मरण पावल्यानंतर आपली सुकीर्ती मागे उरायला हवी असेच वर्तन, हे सज्जन मना, नेहमी ठेवावे. तू चंदनासारखे झिजावेस आणि सज्जन लोकांना समाधान द्यावेस. जन्माला आला, जगला, मेला. कुणाच्या आठवणीतही राहिला नाही असलं जीवन जगण्यात काय अर्थ? माणसानं असं जगलं पाहिजे की मेल्यानंतरदेखील त्याची सत्कीर्ति दिगंत पसरलेली रहावी. स्मारकातून, पुतळ्यातून नाही तर त्याच्या कर्तृत्वाच्या आठवणीतून तो मागे उरायला हवा. सज्जनहो, हे मनोमन समजून घ्या आणि तसं होण्यासाठीची वर्तणूक ठेवा. चंदन उगाळलं जात असताना घासून घासून झिजतं, पण उगाळणाऱ्या हातालादेखील सुगंधित करून जातं. तसं तुम्ही मनानं असावं. जगात खरोखरीचे सज्जन, गुणीजन असतात त्यांना तुम्ही आपले आहात. असे प्रेमाचे, आदर करण्यासारखे वाटायला हवे. असे वर्तन ठेवा, त्यांना आनंद, समाधान द्या.