Home स्टोरी “दादा हयात असते तर..?” दीपक प्रभावळकर, सातारा 

“दादा हयात असते तर..?” दीपक प्रभावळकर, सातारा 

50

सातारा: अजीतदादाची चिता पेटली की सातव्या मिनिटाला अमित शाह स्क्रीन दाखवणाऱ्या मिडियाला राष्ट्रवादीच्या नेत्यांना इतकी कसली घाई लागलीय की दादा स्वर्गात पोहोचायच्या आधीच त्यांचं घर फोडताय, पार्टी फोडताय, वहिनीला उपमुख्यमंत्री पदावर बसवलं? पोरांची वाटणी केली. दादाचा पक्ष विलीन पण करून टाकलात.

आत्ता काही मिनिटांपूर्वी पर्यंत ज्याला ढाण्यावाघ म्हणत होता, आता त्याची पाठ फिरून काही क्षण होत नाहीत तोवर इतकं पुढं निघालात. अरे दादा हयात असता तर बिषाद झाली असती का? दादाच्या आत्म्याला नाय तर स्वतः आंतरआत्म्याला तरी थोडं भ्या….. साल्यांनो !

 

दादाचं विमान बुधवारी 8.46 ला कोसळ्या पासून गुरुवारी दुपारी 12.27 पर्यंत सर्वत्र दादा, दादा आणि दादा ! 12. 16 ला अग्नी दिवून झाला की लग्गेच “अमित शाह विमानतळाच्या दिशेने निघाले” पुढच्या सात – आठ मिनिटांत दुःखाचे अश्रू गिळून लग्गेच शहाच्या मागं?

 

हो, मला माहित आहे की, “मिडियाला एक पाऊल पुढं रहावं लागतं”..!  पण इतकं? की पूर्ण चितेने आग पकडायच्या आत तुम्ही मंत्रालयापर्यंत धावत जावं? दादाच्याच पक्षातल्या आमदार – मंत्र्यांनी कालचं हामसून उमसून रडणं थांबवून “पक्षाचं पुढं काय होणार?” यावर बाईट देणं. हे सगळं संतापजनक चाललंय. तिकडं चिता धडाडत असताना इकडं, अजीतदादांच्या पश्चात कोण? सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्री करण्याची काहींची मागणी, पार्थ – जय यांच्यापैकी एकाला कॅबिनेट, दोन्ही पोरांना तितका अनुभव नसल्याने घड्याळाचे अध्यक्षपद कोणाला? दादांकडे बारामतीतील आणि राज्यातील विविध संस्था यांची पदे आहेत. ती कशी वाटली जाणार?

 

दादाचा पक्ष शरद पवारांच्या पक्षात विलीन करून जयंत पाटलांना अध्यक्ष पद द्यावे. सुप्रिया आज अंत्यविधी वेळी जसा पुढाकार घेत होत्या तसं पाहता त्यांना अध्यक्ष पद दिले तर सुनेत्रा वहिनीला मान्य होईल का? आज दादासाठी भाजपाने दिलेल्या जाहिराती आणि अमित शाह यांचं अंत्यविधीला येणं पाहता दादांचा पक्ष भाजपामध्ये विलीन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दोन्ही राष्ट्रवादी एक झाल्यास त्या महायुतीमध्ये सहभागी होण्याला शरद पवार मान्यता देतील का?

 

…….. अरे हो हो हो !

दादाची चिता तरी शांत होऊ दे. पुढील प्रश्न निर्माण होणार आहेत त्याची उत्तरं पवार कुटुंबीय बसून शोधतील की. पार्टी फुटलीय, घर नाही. मिडियाला नुसती घाई लागलीय असं नाही. राष्ट्रवादीचे नेते सुद्धा घरी परत जाताना थांबून थांबून बाईट देतायत. झिरवळ सारख्या माणसानं पवार कुटुंबाचा निर्णय घ्यावा? सुनेत्रा वहिनींना कोणतं मंत्रीपद द्यावं हे त्यानं सांगावं? अरे दादा हयात असता तर…..? मीडियाच्या प्रश्नाला दादांनी कधी अव्हेरलं नाही. पण असल्या टुकार प्रश्नावर “छान वाटतंय….. हे नाय छान वाटत””.

तू गप रे, तुला काय कळत न्हाय. उगाच पुढं पुढं विचारू नकोस. सर्रर्रर्र मागं” “ते काय म्हणाले ते त्यांना जाऊन विचार, माझ्या पुढं कशाला तुझं दांडूक नाचवतोयस” “अरे बाळा हा प्रश्न आमच्या घरचा आहें, आंम्ही बघून घेऊ. तू नंको काळजी करूस” अशी दादानं मिश्किलीत उत्तरं दिली असती पण त्याचा संताप लपवून. या बाईट देणाऱ्या आमदार – मंत्री – नेत्यांना तर दादांनी सोडलं असतं…..?

दादा आले की, “बरं निघूया सभेला?

कोण कोण बोलणार आहे? ये तू नको बोलूस. किती बडबडतोस….. कश्याला त्या तात्याला? त्याचं मागचं भाषण ऐकलंय उगा मोठ्ठ मोठ्ठ बोलतो…… स्थानिक आमदार असला तरी असू दे, तू फक्त आभार मान” असं म्हणून ज्याच्या त्याच्या पारड्यात त्याचं त्याचं माप घालणारा होता दादा.

 

“व्हय रं, त्या जिल्ह्यात काय भाषण केलंस? पश्चिम महाराष्ट्राचा विकास्स…. ये हिकडं तुझा पश्चिम महाराष्ट्र बाहेरच काढतो. अरे तुझा आवाका किती, तू बोलतो किती?दादांनी वयाची चाळीस वर्षं या स्टाईलमध्ये काढली असताना त्याची पाठ वळताच सुरु झालेली बेताल बडबड दादाच्या चाहत्यांना संताप आणणारी आहे.

 

विश्लेषण दादांच्या ऐहसीती प्रमाणे करा, तुमच्या लायकी प्रमाणे का करताय…..?

लोकशाही आहे, कुणाचं तोंड धरणार? मिडिया असो किंवा राष्ट्रवादीचे मंत्री – आमदार. प्रत्येकाला लग्गेच का होईना विश्लेषण करण्याचा अधिकार आहे. पण……? ज्या अजीतदादानं नरेंद्र मोदी, अमित शाह, भाजपा यांच्याकडे जाऊन कधी मान तुकवली नाही, उजव्या आघाडीत जाऊन शाहू – फुले – आंबेडकर विसरले नाहीत. ही त्यांची ऐहसीकता होती. त्याप्रमाणे विश्लेषण झालं तर किमान माफी योग्य असेल.

 

चिता विजयच्या आत जे मंत्रालयापासून साऱ्या महाराष्ट्रभर डिंडून आलेत त्यांच्याबद्दल आधीच संताप होत असताना आपल्या लायकी प्रमाणे बोलणाऱ्यांना काय….?

लोक शोकमग्न आहेत. नायतर……!

 

खरंतर, दादाची चिता रचायच्या आधीच हा घातपात आहे म्हणणारे……विमानात 7.2 लाख होते असा दावा करणारे…… विकीपीडियावर विमान कोसळलायच्या आधीच दादांचा मृत्यू झाल्याची नोंद कशी……दक्षिण बाजूने जाणाऱ्या विमानाला अपघात होणार आहे. हे मी आधीच सांगितलं होतं…… असं म्हणणारे सुद्धा आहेतच की. अश्या वेळी मला एकच विचार येऊन गेला. “दादा हयात असते तर……?”

लेखक:- दीपक प्रभावळकर

लेखक: दीपक प्रभावळकर, सातारा, संपर्क :- 9527403232