Home जागतिक घडामोडी दक्षिण कोरियामध्ये पावसामुळे हाहाकार; जनजीवन विस्कळीत

दक्षिण कोरियामध्ये पावसामुळे हाहाकार; जनजीवन विस्कळीत

156

१६ जुलै,वार्ता: दक्षिण कोरियामध्ये पावसाने थैमान घातले असून पुरामुळे आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला आहे तर १४ जण बेपत्ता असल्याचे समजते. हजारो लोकांना पुराचा फटका बसला असून त्यांना बेघर व्हावे लागले आहे. सरकारी यंत्रणेकडून युध्दपातळीवर मदतकार्य सुरू आहे. देशभरात मुसळधार पावसामुळे सुमारे ४७६३ लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. सरकारी यंत्रणा झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन करत असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

ओसोंग शहरातील भुयारी मार्गात १९ वाहने पाण्यात बुडाली आहेत. उत्तर ग्योंगसांगमध्ये भूस्खलन आणि घरे कोसळून सुमारे १६ लोकांचा तर दक्षिण चुंगचेंग प्रांतात ४ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. सेजोंग शहरात दरड कोसळून एकाचा मृत्यू झाला. तसेच चेओंगजू येथे भूस्खलनामुळे एकाचा मृत्यू झाल्याचे समजते. नॉनसान भागातही भूस्खलनामुळे इमारत कोसळून दोघांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. याव्यतिरिक्त, येओंगजूच्या आग्नेय काउंटी आणि चेओन्गयांगच्या मध्यवर्ती काउंटीमध्ये घर कोसळल्यामुळे तिघांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, गोसानमधील सुमारे ६,४०० रहिवाशांना स्थलांतरित करण्यात आले आहे.